संडे स्पेशल मुलाखत : परिस्थितीवर मात करुन जपले सायकलिंगचे वेड

By साहेबराव नरसाळे | Published: February 17, 2019 11:31 AM2019-02-17T11:31:30+5:302019-02-17T11:32:01+5:30

सायकल घ्यायलाही पैसे नसताना रवींद्र करांडे यांनी सायकलिंग या खेळामध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला़ त्यांनी हातउसने पैसे उचलून महागडी सायकल घेतली अन् राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्काराला गवसणी घातली़ या ध्येयवेड्या रवींद्र करांडे यांच्या साधलेला हा संवाद

Sunday Special Interview: Keeping the situation under control, | संडे स्पेशल मुलाखत : परिस्थितीवर मात करुन जपले सायकलिंगचे वेड

संडे स्पेशल मुलाखत : परिस्थितीवर मात करुन जपले सायकलिंगचे वेड

ठळक मुद्देशिवछत्रपती पुरस्कार विजेते रवींद्र करांडे यांच्याशी बातचीत

साहेबराव नरसाळे
सायकल घ्यायलाही पैसे नसताना रवींद्र करांडे यांनी सायकलिंग या खेळामध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला़ त्यांनी हातउसने पैसे उचलून महागडी सायकल घेतली अन् राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्काराला गवसणी घातली़ या ध्येयवेड्या रवींद्र करांडे यांच्या साधलेला हा संवाद...


प्रश्न : तुमचे शिक्षण कसे आणि कोठे झाले?
उत्तर : नगर तालुक्यातील दरेवाडी हे माझे गाव आहे़ सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला़ घरची परिस्थिती त्यावेळी फार चांगली नव्हती़ गावात प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी वाळूंज येथे ज्ञानदीप विद्यालय गाठले़ तेथे ५ वी ते १० पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले़ ११ वी व १२ वीसाठी नगरमधील मार्कंडेय विद्यालयात प्रवेश घेतला़ चांगल्या गुणांनी बारावी उत्तीर्ण झालो़ पदवीसाठी नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.


प्रश्न : तुम्हाला खेळाची आवड कशी लागली?
उत्तर : न्यू आर्टस् कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होतो़ त्यावेळी कॉलेजमध्ये खेळाला चांगले वातावरण होते़ त्यामुळे मीही खेळाकडे वळलो़ सुरुवातील क्रॉस कंट्री हा खेळ आवडायचा़ त्यात सहभाग घ्यायला गेलो़ परंतु मुदत संपली होती़ त्याचवेळी तेथे पांडुरंग लहारे हा खेळाडू भेटला़ तो सायकलिंग खेळामध्ये निष्णात होता़ मी त्याच्याकडे चौकशी केली़ माझा भाऊ धनंजय व पांडुरंग दोघे मित्र होते़ त्यामुळे पांडुरंगने मला सायकलिंग खेळाविषयी माहिती दिली़ त्यासाठी मी सायकल घेण्याची गळ आई-वडिलांना घातली़ पण आमच्याकडे सायकल घेण्यापुरतेही पैसे नव्हते़ महागडी सायकल घेण्यापेक्षा तेच पैसे जर एखाद्या व्यवसायात गुंतविले तर चांगले यश मिळेल, असा सल्ला गावातील अनेकांनी दिला़ आई, वडिलांनाही तो पटला़ महागडी सायकल घेण्याची त्यांचीही इच्छा नव्हती़ पण भावाच्या पाठिंब्यामुळे मी सायकल घेण्यासाठी आग्रही राहिलो़ ही बाब माझे चुलते डॉ़ अनिल करांडे यांना समजली़ त्यांनी मला सायकल घेण्यासाठी उसने पैसे दिले़ पुढे त्यांचे पैसे आम्ही परत केले.


प्रश्न : सायकलिंगमध्ये कोणाचे मार्गदर्शन लाभले?
उत्तर : न्यू आर्टस् कॉलेजमधील प्राध्यापक धन्यकुमार हराळ यांनी सायकलिंग खेळाबाबत खूप मार्गदर्शन केले. माझ्याकडून सराव करुन घेतला़ मी २००९ साली न्यू आर्टस् कॉलेजकडून खेळताना विभागीय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला़ पुढे माझी विद्यापीठाच्या संघात निवड झाली़ विद्यापीठाकडून अनेक स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविले़ अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके मिळविली़ २०११ साली मी भारतीय सैन्यदलात भरती झालो़ तरीही हराळ सर मला सायकलिंगबाबतीत मार्गदर्शन करीत होते़ त्यांच्यामुळेच मी सैन्यात असतानाही खेळ सुरुच ठेवला.


प्रश्न : सध्या सराव कोठे सुरु आहे व पुढील लक्ष्य काय?
उत्तर : सध्या मी नगरमध्येच आर्मीमध्ये हवालदार या पदावर आहे़ आर्मीच्या संघासोबत आमचा रोज सकाळी नगर-औरंगाबाद व नगर-पुणे महामार्गावर सायकलिंगचा सराव सुरु असतो़ आर्मीतील वरिष्ठ मार्गदर्शकांच्या सल्ल्यांनुसार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहे़ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यावर भर असणार आहे. खूप कष्टातून मी सायकलिंगमध्ये यश मिळविले आहे़ सरकारने माझ्या कामगिरीची दखल घेऊन मला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला, याचा मनस्वी आनंद आहे़ या यशात माझ्या सर्व प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. 

 

Web Title: Sunday Special Interview: Keeping the situation under control,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.