संडे स्पेशल मुलाखत : हीच वेळ आहे, क्षयरोग निर्मुलनाची! - डॉ. सांगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:54 PM2019-03-24T12:54:51+5:302019-03-24T12:54:55+5:30

‘हीच वेळ आहे़़़ क्षयरोग निर्मुलनाचे वचनपूर्ती करण्याची, क्षयमुक्त जगासाठीची, तपासणीची आणि क्षयबाधितांपर्यंत पोहोचण्याची’ असे घोषवाक्य घेऊन रविवारी (दि़२४) जगभर क्षयरोग दिन साजरा होत आहे़

Sunday Special Interview: This is the time, tuberculosis! - Dr. Sangale | संडे स्पेशल मुलाखत : हीच वेळ आहे, क्षयरोग निर्मुलनाची! - डॉ. सांगळे

संडे स्पेशल मुलाखत : हीच वेळ आहे, क्षयरोग निर्मुलनाची! - डॉ. सांगळे

साहेबराव नरसाळे
अहमदनगर - ‘हीच वेळ आहे़़़ क्षयरोग निर्मुलनाचे वचनपूर्ती करण्याची, क्षयमुक्त जगासाठीची, तपासणीची आणि क्षयबाधितांपर्यंत पोहोचण्याची’ असे घोषवाक्य घेऊन रविवारी (दि़२४) जगभर क्षयरोग दिन साजरा होत आहे़ नगर जिल्ह्यात मागील वर्षी चार हजार क्षयरुग्ण आढळून आले होते़ त्यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार सुरु असून, ३ हजार ८०३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत़ तसेच क्षयरुग्णांना १० लाख ८२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ संदीप सांगळे यांनी सांगितले़
प्रश्न : क्षयरोगाची लक्षणे काय आहेत?
उत्तर : दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला असणे, खोकताना थुंकीवाटे रक्त पडणे, ताप येणे (मुख्यत्वे रात्री), भूक कमी लागणे, झटकन वजन कमी होणे, छातीत दुखणे, अशक्तपणा व थकवा जाणवणे, फुफ्फुसात संसर्ग झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ही क्षयरोगाची लक्षणे समजावीत़
प्रश्न : क्षयरोग टाळण्यासाठी काय करावे?
उत्तर : क्षयरोग टाळण्यासाठी तोंड झाकून खोकणे किंवा शिंकावे तसेच कोठेही थुंकू नये़ थुंकीतून क्षयरोग पसरतो़ रोग्याने ताबडतोब स्वत:ला तपासून घ्यावे, पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर द्यावा़
प्रश्न : क्षयरोगावर उपचार काय आहेत?
उत्तर : क्षय रोगासाठी बी.सी.जी नावाची लस वापरली जाते. ही लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते. मोठ्या माणसांसाठी डॉटस् ही खात्रीशीर उपचार पद्धती आहे़ क्षयरोगाचा उपचार सात ते आठ महिन्यांचा असून, नियमती औषधे घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो़ क्षयरोगावर शासकीय रुग्णालयांमध्ये पूर्णपणे मोफत उपचार केले जातात़ त्याशिवाय रुग्णांना प्रत्येक महिन्याला ५०० रुपये पोषण आहार भत्ताही दिला जात आहे़ खासगी रुग्णालयातील जे डॉक्टर क्षयरोगाचे निदान करतील आणि शासकीय रुग्णालयाला कळवतील, अशा डॉक्टरांसाठीही ५०० रुपये एका रुग्णाच्या माहितीसाठी मानधन देण्यात येते़
प्रश्न : किती क्षयरुग्णांना पोषण आहार भत्ताही दिला गेला आहे़
उत्तर : २०१८ पासून आत्तापर्यंत ४ हजार ३५ क्षयरुग्णांना १० लाख ८२ हजार १०० रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे़ हे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्यात येते़

संपर्क कोणाशी साधावा?
सरकारने क्षयरुग्णांसाठी कॉल सेंटर सुविधा सुरु केली आहे़ रुग्णांसाठी १८००११६६६६ हा क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे़ त्याशिवाय जिल्हा रुग्णालय, शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांनी संपर्क करावा़

मागील वर्षात किती क्षयरुग्ण आढळले आहेत?
जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत ३६ हजार ७५२ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, ४ हजार २८१ क्षयरुग्ण आढळून आले आहेत़ या सर्व रुग्णांवर उपचार सुरु आहेत़ तर जानेवारी ते डिसेंबर २०१७ मध्ये ४ हजार २१५ रुग्ण आढळले होते़ त्यापैकी ३ हजार ८०३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत़ इतरांवर उपचार सुरु आहेत़ २०१८ पासून क्षयरुग्णांना दैनंदिन औषधोपचार पद्धती सुरु करण्यात आली आहे़ त्यामुळे क्षयरुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होत आहे़

प्रत्येक वर्षी २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन जगभर साजरा करण्यात येतो़ या वर्षी ‘हीच वेळ आहे़़़’ हे घोषवाक्य घेऊन क्षयरोग दिन साजरा करण्यात येत आहे़ - डॉ़ संदीप सांगळे

 

 

Web Title: Sunday Special Interview: This is the time, tuberculosis! - Dr. Sangale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.