संडे motivation : विहिरी आटल्याने शेततळ्यातून चारा वाचविण्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 03:25 PM2019-03-24T15:25:35+5:302019-03-24T15:25:41+5:30
तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील आठमाही बागायतीसाठी निर्माण झालेल्या आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील विहिरींची पाणी पातळी कमालीची खोल गेली आहे
हेमंत आवारी
अकोले : तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील आठमाही बागायतीसाठी निर्माण झालेल्या आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील विहिरींची पाणी पातळी कमालीची खोल गेली आहे. दुष्काळाची झळ सुरु झाल्याने शेतकरी चिंतेत दिसू लागला आहे. आढळेच्या लाभक्षेत्रातील पिंपळगाव निपाणी, वीरगाव, हिवरगाव, गणोरे, वडगाव लांडगा या भागात मोठ्या प्रमाणावर शेततळी आहेत. शेततळ्यात साठलेल्या पाण्यातून चारा वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
शिमगा संपताच पिण्याच्या पाण्याची बोंब आदिवासी डोंगरदरीच्या क्षेत्रात सुरु झाली आहे. दोन ठिकाणी टँकर सुरु झाले आहेत. अकोले शहरापासून अवघ्या ५ मैल अंतरावर असलेल्या धामणगाव आवारी या गावासह आढळा धरणाच्या उशाला असलेल्या देवठाणच्या सात वाड्या व कळस येथील मांडवदरा ही आदिवासी वाडी तहानलेली आहे. ३-४ गावांचे टँकर मागणी प्रस्ताव महसूल दरबारी दाखल झाले आहेत.
आढळा धरणातून चालू रब्बी हंगामात केवळ एकमेव आवर्तन मिळाले. या आवर्तनाने रब्बीच्या पिकांऐवजी चारा जगविण्यासाठी लाभधारकांनी खरी पराकाष्टा केली. पाण्याअभावी रब्बीची पिके करपून गेलीच व आवर्तनाच्या पाण्यातून हिरवागार
झालेला चाराही अनेकठिकाणी पिवळा पडला आहे.
विहिरींचे तळ उघडे पडल्याने ऊस, घास, मका ही चाऱ्याची पिके जगविण्यासाठी शेततळ्यातील पाण्याचा वापर सुरु आहे. एकूण शेततळ्यांपैकी १० टक्के शेततळ्यात पाणीसाठा असला तरी देखील तो येत्या आठ पंधरा दिवसातच संपेल. एप्रिलच्या पूर्वार्धापासूनच चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. महसूल प्रशासनाने जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी अंकुश थोरात, कृष्णकांत थोरात, बाळासाहेब अस्वले, भगवान थोरात, प्रकाश वाकचौरे यांचेसह शेतकऱ्यांनी केली आहे.
पाणी संपल्यावर पुढे काय?
आढळा भागात उजाड होत चाललेल्या शेतीला आता शेततळ्यांचाच आधार उरला आहे. मात्र या शेततळ्यातील पाणी संपल्यावर पुढे काय. शेततळ्यात विकत पाणी टाकायचे, पण कुठून? हा प्रश्न शेतकºयांपुढे आहे.