सासऱ्यानेच केला सुनेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:39 AM2021-02-28T04:39:02+5:302021-02-28T04:39:02+5:30
कोपरगाव : सासऱ्याने आपल्या सुनेवर जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार करून सासरा-सुनेच्या नात्याला काळिमा फसल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव ...
कोपरगाव : सासऱ्याने आपल्या सुनेवर जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार करून सासरा-सुनेच्या नात्याला काळिमा फसल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सासऱ्यासह पतीच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२६ ) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सासरा फरार आहे.
२१ वर्षीय महिलेचे कोपरगाव तालुक्यातील एका गावातील तरुणाशी मे २०१८ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर तीन महिने सासू, सासरे व सासू हे सुनेशी चांगले वागत होते. मात्र, काही दिवसांनी सासऱ्याची वाईट नजर पडली. त्यानंतर सून अंघोळ करताना डोकावणे, चहा दिल्यानंतर तिचा हात पकडणे अशा गोष्टी सासरा करू लागला. ऑगस्ट २०१८ मध्ये एके दिवशी दुपारी १ वाजेच्या सुमारास सून घरात एकटीच असल्याचे पाहून सासऱ्याने तिच्यावर बळजबरी करून अत्याचार केला. कुणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या आईला मारून टाकीन, अशी धमकी दिली. सुनेने त्याच रात्री आपल्या पतीला व सासूला घडलेला प्रकार सांगितला. मात्र त्या दोघांनीही सुनेचे काहीच ऐकले नाही.
त्यानंतर सासऱ्याने त्याच महिन्यात पुन्हा सून घरात एकटी असताना तिच्यावर दोनदा अत्याचार केला. ही बाब पीडित महिलेने तिच्या पतीला सांगितले. तुला नांदायचेच नाही, त्यामुळे तू माझ्या वडिलावर असे पती म्हणाला. त्यामुळे पीडितेने हा प्रकार तिच्या नातेवाइकांनादेखील सांगितला नाही. डिसेंबर २०१८ मध्ये तुला कायमची माहेरी सोडून देतो, असे सांगत पतीने माहेरी सोडले. दोन महिन्यांनंतर पीडित महिला तिच्या आईसह सासरी आल्यानंतर पतीसह सासू, सासरे व सासू यांनी तिला घरात घेतले नाही. त्यामुळे ती पुन्हा माहेरी निघून गेली. त्यावर बरेच महिने उलटून गेल्यानंतर पीडित महिलेच्या माहेरची मंडळी तिला सासरी पाठविण्याची तयारी करीत असताना पीडितेने घडलेला प्रकार सांगत सासरी जाण्यास नकार दर्शविला.
पीडित महिला व नातेवाइकांनी पोलीस ठाणे गाठून सासरा व पती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहे.