सुनीता गडाखांचा राजीनामा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 10:36 AM2018-08-04T10:36:34+5:302018-08-04T10:36:58+5:30
अहमदनगर : नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख यांच्या सभापतींसह सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर झाला आहे. रिक्त पदाचा अहवाल जिल्हा ...
अहमदनगर : नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख यांच्या सभापतींसह सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर झाला आहे. रिक्त पदाचा अहवाल जिल्हा परिषदेने राज्य निवडणूक आयोगाला शुक्रवारी पाठविला आहे. त्यामुळे नेवासा पंचायत समिती सभापतीसह सोनई गणाच्या सदस्य पदासाठी पोट निवडणूक होणार आहे.
मराठा, मुस्लीम आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गडाख यांनी सभापतींसह सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांच्याकडे मंगळवारी दिला होता. अध्यक्ष कार्यालयाकडून राजीनामा मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला़ त्यावर स्वाक्षरी करून मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी गुरुवारी सायंकाळी पोहोच दिली. याचाच अर्थ ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत. महाराष्ट्र राज्य पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ७१ नुसार प्रशासनाने नेवासा पंचायत समितीचे सभापती, तर कलम ६० नुसार सोनई गणाचे सदस्य पद रिक्त झाल्याचा अहवाल जिल्हाधिका-यांसह निवडणूक आयोगाला कळविला आहे. नेवासा पंचायत समिती माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या शेतकरी क्रांतीकारी पक्षाच्या ताब्यात आहे. पंचायत समितीत १४ पैकी १२ सदस्य शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकरी क्रांतीकारी पक्षालाच सभापती पदाची संधी मिळेल. त्यामुळे नेवासा पंचायत समितीचे पुढचे सभापती कोण, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख यांनी दिलेल्या राजीन्याची पोहोच मुख्यकार्यकारी अधिका-यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गडाख यांचे सभापती व सदस्य, ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत. तसा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. -वासुदेव सोळुंके, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, समान्य प्रशासन, जिल्हा परिषद