कामचुकारांना पोलीस अधीक्षकांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:04+5:302021-03-29T04:15:04+5:30
गुन्हेगारीच्या दृष्टीने तोफखाना पोलीस ठाणे संवेदनशील आहे. या ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत चैन स्नॅचिंग, घरफोडी, दरोडा, मोटर सायकल ...
गुन्हेगारीच्या दृष्टीने तोफखाना पोलीस ठाणे संवेदनशील आहे. या ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत चैन स्नॅचिंग, घरफोडी, दरोडा, मोटर सायकल चोरी आदी गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे तडीपार गुंडांनी नगर शहरात येऊन भरदिवसा बालिकाश्रम रोडवरील दोघा दुकानदारांना मारहाण करत त्यांची लुटमार केली. डीबी ब्रांचला या गुंडांना पकडता आले नाही. अपवाद वगळता इतर गुन्ह्यांच्या तपासातही काहीच प्रगती नव्हती. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात भेट देऊन गुन्ह्यांचा आढावा घेतला तेव्हा अनेक गुन्ह्यांचा तपास शून्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पाटील यांनी निरीक्षक गायकवाड यांना डीबी बरखास्त करण्याची सूचना दिली. डीबीमधील कर्मचाऱ्यांना तात्पुरते पोलीस मुख्यालयात वर्ग करण्यात आले आहे.
.................
कर्मचारी दुसऱ्या कामात असायचे व्यस्त
तोफखान्याच्या डीबी ब्रांचमध्ये उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्यासह १० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. गुन्हेगारांना शोधण्याऐवजी हे कर्मचारी दुसऱ्या कामात व्यस्त असायचे. त्यामुळे गुन्हेगारीच्या घटनांसह तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे.
..............
पाटील यांच्या कार्यपद्धतीतून कामात तत्परता
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस दलाच्या कामात सुसूत्रता आणि तत्परता निर्माण केली आहे. पोलीस ठाण्यात अर्ज न स्वीकारता थेट तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच विलंबाने गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली आहे. टू-प्लस योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अडीच हजार सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करत त्यांच्यावर नजर ठेवली आहे तसेच कामचुकार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
................
तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांचा तपास करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेला अपयश आले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार ही शाखा बरखास्त करण्यात आली आहे. आता चांगले काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून या शाखेचे पुनर्घटन करण्यात येणार आहे.
- सुनील गायकवाड, पोलीस निरीक्षक, तोफखाना पोलीस स्टेशन.