पोलीस अधीक्षकांनी केली वाळूतस्करांची नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:39 AM2019-04-10T11:39:16+5:302019-04-10T11:40:09+5:30
जिल्ह्यातील गुन्हेगारीचे मूळ ठरणाऱ्या वाळूतस्करांना जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी चांगलाच चाप लावला आहे़
अहमदनगर : जिल्ह्यातील गुन्हेगारीचे मूळ ठरणाऱ्या वाळूतस्करांना जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी चांगलाच चाप लावला आहे़ नदीपात्रासह रस्त्यांवर दिवसरात्र पेट्रोलिंग वाढवून वाळूतस्करांची नाकाबंदी केली आहे़ अवैध वाळूउपसा करताना कुणी आढळले तर कडक कारवाई केली जात असल्याने सध्या जिल्ह्यातील वाळूतस्कर अंडरग्राउंड झाले आहेत़
सिंधू यांनी नगरचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम त्यांनी जिल्ह्यातील अवैध वाळूउपशाबाबत माहिती संकलित केली़ आॅक्टोबर २०१८ पासून जिल्ह्यातील एकाही वाळूठेक्याचा अधिकृत लिलाव झालेला नसताना खुलेआम वाळूतस्करी होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली़ याबाबत सिंधू यांनी जिल्ह्यातील वाळूतस्करी बंद करण्याचे पोलिसांना आदेश दिले़ ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळूतस्करी आढळून येईल तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली़ अधीक्षकांच्या या आदेशामुळे सध्या जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी वाळूतस्करांचा चक्का जाम केला आहे़
अवैध वाळूउपसा व वाहतूक करताना कुणी आढळून आले तर थेट कारवाई केली जात आहे़ वाळूतस्करीविरोधात पोलिसांनी
सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे वाळूतस्कर चांगलेच धास्तावले आहेत़
वाळूतस्करीविरोधात ‘लोकमत’ची मोहीम
जिल्ह्यातील वाळूतस्करीविरोधात ‘लोकमत’ने गेल्या दोन वर्षांपासून वृत्तमालिका प्रकाशित करून या विषयाला वाचा फोडली आहे़ वाळूतस्करीमुळे उजाड झालेले नदीपात्र, पर्यावरणाचा ºहास, खालावलेली पाणीपातळी, वाळूतस्करांकडून वारंवार ग्रामस्थ व महसूल पथकांवर होणारे हल्ले, वाळूवाहतूक करणाºया वाहनांमुळे झालेले अपघात ते वाळूतस्करांमुळे जिल्ह्यात एकूणच वाढलेली गुन्हेगारी यावर प्रकाश टाकला आहे़
कोरड्या नदीपात्रांवर आता पोलिसांचा वॉच
उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच नदीपात्र कोरडे होतात़ कोरडे पडलेल्या नदीपात्रात वाळूउपसा करण्यासाठी तस्करांची झुंबड उडायची़ स्थानिक पोलीस आणि महसूल विभागातील अधिकारीही याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करायचे़ त्यामुळे नदीपात्रात खडक लागेपर्यंत हे तस्कर वाळूउपसा करून पर्यावरणाचा मोठा ºहास करत होते़ गेल्या महिनाभरापासून पोलिसांनी नदीपात्र परिसरात पेट्रोलिंग वाढविल्याने वाळूउपसा थांबला आहे़
पोलीस अधिकाऱ्यांनी लिहून दिले प्रतिज्ञापत्र
वाळूतस्करीत भागिदारी अथवा वाळूतस्करांशी कुणा पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचे हितसंबंध आढळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे़ काही पोलीस अधिकाºयांनी तर पोलीस अधीक्षकांना प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे़ ‘आमचा व आमच्या नातेवाईकांचा वाळू वाहतुकीशी काहीही संबंध नाही तसेच माझ्या वा माझ्या नातेवाईकांच्या नावावर असलेले वाहन वाळू वाहतुकीसाठी वापरले जात नाही’ अशा आशयाचा मजकूर या प्रतिज्ञापत्रात आहे़