रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर पोलीस अधीक्षकांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:17 AM2021-04-03T04:17:12+5:302021-04-03T04:17:12+5:30
अहमदनगर : नियमांचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलची स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तपासणी करत ...
अहमदनगर : नियमांचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलची स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तपासणी करत दंडात्मक कारवाई केली. गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील सावेडी परिसरातील एका हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत शहरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. काही हॉटेलचालक व इतर दुकानदार नियमांचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्वतः गुरुवारी रात्री सावेडी येथील एका हॉटेलची तपासणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी हॉटेलमध्ये ग्राहक बिनधास्त जेवणाचा आस्वाद घेत होते. यावेळी पाटील यांनी हॉटेलचालकासह ग्राहकांचीही कानउघडणी करत त्यांना समज दिली. यावेळी हॉटेलचालकाला दहा हजार रुपये तर ग्राहकांना १३ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. दरम्यान, रात्री स्वतः पोलीस अधीक्षक हॉटेलची तपासणी करत असल्याची बातमी पसरताच बहुतांश हॉटेलचालकांनी ग्राहकांना बाहेर काढून देत शटर बंद करून घेतले. दरम्यान, रात्री पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने गस्त घालत तपासणी केली.
..........
पोलिसांना पाहताच ग्राहक, हॉटेलचालकांची धावपळ
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलचालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. गुरुवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांच्या पथकाने टिळक रोड परिसरातील काही हॉटेलची तपासणी केली. यावेळी एक हॉटेल सुरू होते. पोलिसांना पाहताच हॉटेलमध्ये बसलेले ग्राहक व सदर हॉटेलचालकांची चांगलीच धावपळ उडाली. काही ग्राहकांनी हॉटेलमधून पळ काढला. यावेळी हॉटेलचालकास पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला.