कोरोनाने हिरावलेल्या मित्राच्या कुटुंबाला मित्रांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:32+5:302021-05-09T04:22:32+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील कोरोनाने हिरावलेल्या मित्राच्या कुटुंबाला मित्रांचा आधार मिळून लाखमोलाची मदत वारसासाठी उभी राहिली. येथील ...
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील कोरोनाने हिरावलेल्या मित्राच्या कुटुंबाला मित्रांचा आधार मिळून लाखमोलाची मदत वारसासाठी उभी राहिली.
येथील शिवाजी आनंदा वेताळ (वय ३५) हा तरुण अतिशय कमी वयात गेला. त्याच्या पश्चात पक्षाघात झालेले वडील, आई, आजी, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.
भूमिहीन असलेल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना टपरीमध्ये छोटेसे चपला विक्रीचे दुकान थाटून उपजीविका चालवत होते. शिवाजी हेच कुटुंबाचा आधार होते. कुटुंबाचा आधारच गेल्यामुळे कुटुंबाला मदत व्हावी म्हणून वर्गमित्र व नातेवाईक गमावलेल्या मित्राच्या कुटुंबाच्या आधारासाठी पुढे आले.
'एक हात मदतीचा ' या नावाने मित्रांचा सोशल मीडियावर ग्रुप तयार करून मदतीचे आवाहन केले. स्वेच्छेने रोख स्वरूपात मदत गोळा करत मित्राच्या कुटुंबासाठी लाखभर रुपयांचा सामाजिक बांधीलकीतून हातभार लावला.
शिवाजी यांच्या उपचारासाठी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र ढवळे यांनी २८ हजार तसेच संतोष बोरगे यांनी १० हजार रुपयांची मदत केली आहे.
वेताळ कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन रवींद्र ढवळे यांनी केले आहे. देवदैठणमधील आणखी एक होतकरू तरुण संतोष ओहोळ व त्यांच्या वडिलांचे निधन झाले. संतोष यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. संतोष यांच्या १९९२ च्या बॅचच्या मित्रांनी कुटुंबासाठी २० हजार रुपयांची रोख मदत करून कोरोनाने हिरावलेल्या मित्राच्या कुटुंबाला आर्थिक आधार दिला. माजी मुख्याध्यापिका विमल घावटे यांनी ५ हजार रुपयांची मदत केली.