हजारे यांच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धीत शोलेस्टाईल आंदोलन, पारनेर तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 01:26 PM2018-03-26T13:26:08+5:302018-03-26T13:27:50+5:30
राळेगणसिद्धीत तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. जोपर्यंत अण्णांच्या मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत टाकीवरुन खाली न उतरण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे.
पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धी व परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तर राळेगणसिद्धीत तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. जोपर्यंत अण्णांच्या मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत टाकीवरुन खाली न उतरण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे.
लोकपाल, शेतमालाला हमीभाव अशा विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अण्णा हजारे यांनी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर उपोषण सुरु केले आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व सरकारने अण्णांच्या मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ रोज विविध पद्धतीने आंदोलन करीत आहेत. सोमवारी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राळेगणसिद्धी येथे तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन सुरु केले आहे. अण्णांच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरुन खाली न उतरण्याचा निर्धार १६ तरुणांनी केला आहे. सरकार अण्णांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राळेगणचे उपसरपंच लाभेष औटी यांनी केला आहे. रोहिदास पठारे, अरुण भालेकर, प्रभू पठारे, सदाशिव पठारे, रमेश औटी, विलास औटी, महेश अंभोरे, मोन्या फटांगडे, अनिल उगले, बंडू मापारी, प्रशांत औटी, भीमा पोटे, यश मापारी, सुशांत पठारे, अक्षय पठारे, सचिन पठारे आदी कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत आहेत.