अपघातग्रस्तांना मदत : शासन देणार बक्षीस, जिल्ह्यातून पहिला प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:14 AM2018-06-05T11:14:44+5:302018-06-05T11:17:11+5:30

अपघातग्रस्तांना मदत केली तर नाहक पोलिसांची कटकट मागे लागेल या मानसिकतेतून बहुतांशी जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्यांकडे कानाडोळा करून पुढे जातात.  एमआयडीसी पोलिसांनी मात्र अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे अशी शिफारस करत एक सकारात्मक संदेश दिला आहे.

Support for the victims of the accident: Government's award, the first proposal filed in the district | अपघातग्रस्तांना मदत : शासन देणार बक्षीस, जिल्ह्यातून पहिला प्रस्ताव दाखल

अपघातग्रस्तांना मदत : शासन देणार बक्षीस, जिल्ह्यातून पहिला प्रस्ताव दाखल

अहमदनगर : अपघातग्रस्तांना मदत केली तर नाहक पोलिसांची कटकट मागे लागेल या मानसिकतेतून बहुतांशी जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्यांकडे कानाडोळा करून पुढे जातात.  एमआयडीसी पोलिसांनी मात्र अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे अशी शिफारस करत एक सकारात्मक संदेश दिला आहे.
नगर तालुक्यातील शिंगवेनाईक येथे २५ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता शिर्डी येथून नगरच्या दिशेने येणाºया प्रवासी बसचा अपघात झाला. ही बस रस्त्यावरच आडवी पडल्याने यामध्ये ३४ प्रवासी अडकून पडले़ यातील बहुतांशी जण गंभीर जखमी झालेले होते. ही घटना समजताच शिंगवे नाईक येथील सरपंच सुनील को-हाळे, उपसरपंच सुनील जाधव यांच्यासह विजय जाधव, रावसाहेब जाधव व अनिल डोळस हे तत्काळ घटनास्थळी आले. या ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. तसेच याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह सहाय्यक निरीक्षक गोरे, सहाय्यक फौजदार गोसावी, कॉन्स्टेबल ढाकणे, काळे, गावडे, पांढरकर, मणिकेरी व कोळपे शिंगवेनाईक येथे दाखल झाले़ यावेळी ग्रामस्थ व पोलीस पथकाने बसमध्ये अडकलेल्या ३४ प्रवाशांना बाहेर काढले़ जखमींना नगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जे प्रवासी जखमी झाले नव्हते त्यांची शिंगवे नाईक येथे तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. क्रेनद्वारे रस्त्यात पडलेली बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. 
अपघातसमयी तत्काळ मदत कार्य करून जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणा-या या पाच ग्रामस्थांना शासनाच्या अध्यादेशानुसार मदत मिळावी, असा प्रस्ताव सहाय्यक निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला आहे. अधीक्षकांमार्फत हा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. 

अशी आहे बक्षीस योजना
अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत यासाठी शासनाने २०१४ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार अपघातग्रस्तांना मदत करणा-या व्यक्ती, संस्था, समूह यांना ५० हजार ते दीड लाख रूपयांपर्यंत बक्षीस देण्यात येते. अपघात घडल्यानंतर एक महिन्याच्या आत बक्षिसाची मागणी करणारा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, वाहतूक शाखेचे निरीक्षक यांच्यामार्फत पाठविणे बंधनकारक आहे. प्रस्ताव गेल्यानंतर मार्च अखेरपर्यंत शासनाकडून संबंधितांना हे बक्षीस दिले जाते. 

अपघात झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने बहुतांशी जणांचा रस्त्यावरच प्राण जातो. अपघाताची घटना निदर्शनास आल्यानंतर तेथून जाणा-या प्रवाशांनी अथवा परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, जखमींना मदत करावी, त्यांना रूग्णालयात दाखल करावे अशी अपेक्षा असते. बहुतांशी जण अशावेळी मदतही करतात तर काही नागरिक मदत करत नाहीत. अशा घटनांबाबत समाजात एक सकारात्मक संदेश जावा, अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी अपघातग्रस्तांना मदत करणा-या शिंगवेनाईक येथील ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे, यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
- विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी ठाणे

 

Web Title: Support for the victims of the accident: Government's award, the first proposal filed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.