सुप्रियाला मिळाले इटलीतील पालक, सारंग अन दिव्यालाही मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 12:26 PM2019-05-02T12:26:47+5:302019-05-02T12:27:02+5:30

सुप्रिया, सारंग आणि दिव्या या तिनही बालकांचा जन्मल्यानंतर लगेच मृत्यूशी संघर्ष सुरू झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडणा-या त्यांच्या मातांनी या बालकांची फरफट होऊ नये

Supriya received the Italian parent, Sarang An Diya also got the support | सुप्रियाला मिळाले इटलीतील पालक, सारंग अन दिव्यालाही मिळाला आधार

सुप्रियाला मिळाले इटलीतील पालक, सारंग अन दिव्यालाही मिळाला आधार

अहमदनगर : सुप्रिया, सारंग आणि दिव्या या तिनही बालकांचा जन्मल्यानंतर लगेच मृत्यूशी संघर्ष सुरू झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडणा-या त्यांच्या मातांनी या बालकांची फरफट होऊ नये म्हणून स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राला साकडे घातले. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या परिसस्पर्शाने त्यांचा जणू पुनर्जन्म झाला.
सुप्रियाला इटली देशातील कनवाळू पालक आणि दोन मोठे भाऊ मिळाले. सारंगला टाटा उद्योग समूहातील वरिष्ठ व्यवस्थापकांनी तर कुमारी दिव्याला बालिकेस पुण्यातील नामवंत वकील दांपत्याने दत्तक घेतले. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या रुपाली जयकुमार मुनोत बालकल्याण संकुलात हा दत्तक विधान सोहळा संपन्न झाला. तेव्हा सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

धारावीतून इटलीकडे
मुंबईत राहणा-या राजश्रीचे आई-वडिलांनी कर्ज काढून रिक्षाचालकाशी लग्न लावून दिले. अवघ्या वर्षभरातच राजश्रीला एक मुलगा झाला. परंतु लवकरच तिला समजले की तिच्या पतीचे बाहेर अनैतिक संबंध आणि अनेक प्रपंच होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राजश्रीने स्वाभिमानाने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. स्वत:च्या मुलाला शिक्षण देत असताना येणा-या अडचणींमुळे तिने पुन्हा लग्न करण्याचे ठरवले. परंतु राजश्रीला लग्नाच्या आणाभाका देणारा तिला पाचवा महिना लागल्यावर परागंदा झाला. कोणीतरी राजश्री स्नेहांकुर केंद्राची माहिती सांगितली. स्नेहांकुरशी तिने संपर्क केल्यावर तीन तासात स्नेहांकुरची टीम तिच्यापर्यंत पोहोचली. यथावकाश २२ मार्च २०१८ रोजी अहमदनगर मधील डॉक्टर प्रीती देशपांडे यांनी तिची प्रसूती केली. सुप्रियाचा जन्म झाल्यावर लक्षात आले, तिला अनेक व्याधी आणि आजार जडले आहेत. अवघ्या बाराशे ग्रॅम वजनाच्या सुप्रियाच्या मूत्रपिंडांना सूज आलेली होती. यकृत नीट काम करीत नव्हते आणि लॅक्टोज इनटॉलरन्स या आजारामुळे तिची परिस्थिती चिंताजनक झाली. पुणे येथील केईएम रुग्णालयात मध्यरात्री तिला हलविण्यात आले. स्नेहांकुर टीम मधील समन्वयक संतोष धर्माधिकारी, वीरेश पवार, परिचारिका शालिनी विखे आणि सविता काळे यांनी सलग बारा दिवस सुप्रियाला केईएम रुग्णालयात राहून उपचार दिले. या काळात स्नेहांकुरच्या रुग्णवाहिकेत सर्वांनी बारा दिवस रहिवास केला. अखेरीस सुप्रिया धोक्यातून बाहेर आली. सुप्रियाला इटली येथील व्हेनिस शहरात राहाणारे पियारली आणि त्या दांपत्त्याने दत्तक घेतले. स्वत:चे एक मूल असलेल्या या दांपत्याने यापूर्वी केरळ येथील एका अपंग बालकास दत्तक घेतले आहे.
आपल्या लग्नाचा ५१ वा वाढदिवस स्नेहांकुर प्रकल्पात साजरा करणा-या लता आणि अशोकलालजी भळगट, (सोनई, तालुका नेवासा) येथील समाजशील दाम्पत्याच्या शुभहस्ते सुप्रियाला पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.

नशिबाने वाचला, मुंबईत पोहोचला.
४ नोव्हेंबर २०१८ रोजी, (केज, जि- बीड) येथील बरड फाटा येथे चौकाजवळ पहाटेच कोणीतरी आणून टाकलेले बाळ दिसून आले. या बाळाला प्रचंड जखमा झालेल्या होत्या. वेदनांनी विव्हळणा-या बालकास वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी बीड येथील बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांना साकडे घातले. त्यांनी स्नेहांकुरला संपर्क केला. बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालय यानेही उपचारांसाठी मदतीचा हात दिला. कांबळे यांच्या पुढाकाराने हे बाळ स्नेहांकुर केंद्रात दाखल झाले. टाटा उद्योग समूहातील सुवरणा आणि रश्मी यांनी या बालकाचा स्वीकार केला. नगरमधील प्रख्यात समाजसेवक दाम्पत्य साधना आणि नरेंद्र काळे यांच्या हस्ते सारंगचे दत्तक विधान करण्यात आले.

३१ जानेवारी २०१९ रोजी सावित्रीने कुमारी दिव्या बाळाला जन्म दिला. सावित्रीच्या शेतमजुरी करणा-या वडिलांचे सहा वर्षांपूर्वीच निधन झाले होते. आई मोलमजुरी करून प्रपंच चालवायची. नातेवाईक आतील एका शिकलेल्या मुलाशी आईने सावित्रीचे लग्न लावून दिले. तिला मारहाण करणे, सतत दारू पिणे, यामुळे कंटाळून सावित्रीने नव-याचे घर सोडले आणि आईबरोबर मोलमजुरी सुरू केली. आयुष्यभर असेच राहणे शक्य नव्हते. त्यामुळे लग्न ठरवून पुन्हा प्रपंचाचा घाट सावित्रीने घातला. मात्र अडचणी आल्या. पुढील सारे प्रश्न निस्तरण्यासाठी कोपरगाव येथील स्नेहालय प्रकल्पाच्या संघटक संगीता शेलार यांनी तिला स्नेहांकुर पर्यंत पोहोचविले. त्यामुळे दिव्याचा जन्म झाला. तेव्हा सावित्री एकटी नव्हती. स्नेहांकुर प्रसुतीची आणि त्यानंतरची बाळाची आणि आईची सर्व काळजी यथायोग्य घेतली. नियोजित वधू-वर संगणक तज्ञ भूषण मुथीयान आणि नगर मधील कुमारी ऋतुजा संजय गुगळे यांनी दिव्याला पुणे येथील नामांकित वकील दाम्पत्याला सुपूर्द केले. पुणे आणि अमेरिकेत शिकलेला भूषण सध्या अमेरिकेतील वेव्ह कॉम्प्युटिंग कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे.
स्नेहालयचे मानद संचालक निक कॉक्स यांनी प्रास्ताविक तर अ‍ॅड. श्याम आसावा यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दत्तक विधान सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अजय वाबळे पाटील, मनीषा खामकर, कविता पवार, साहेबराव अरुने, प्रवीण पवार, उत्कर्षा जंजाळे, जुई झावरे- शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Supriya received the Italian parent, Sarang An Diya also got the support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.