सुरेगावात सोयऱ्या-धायऱ्यांमुळे निवडणुकीत रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:05+5:302021-01-09T04:17:05+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक सोयरेधायरे व भावकीतील लढतीमुळे रंगतदार वळणावर आली आहे. मागील पाच वर्षे ...
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक सोयरेधायरे व भावकीतील लढतीमुळे रंगतदार वळणावर आली आहे. मागील पाच वर्षे एकमेकांच्या हातात हात घालून राजकारण करणारेच एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
सुरेगाव येथे कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुश रोडे व सरपंच सर्जेराव रोडे यांच्या पॅनलच्या विरोधात माजी सरपंच डॉ. वैशाली मोरे यांचे पती डॉ. अनिल मोरे व उपसरपंच गुलाब रामफळे यांनी पॅनल उभे केले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत हे दोन्ही पॅनलचे प्रमुख एकत्र होते. पहिल्या अडीच वर्षांत डॉ. वैशाली मोरे या सरपंच होत्या तर पुढील अडीच वर्षे सर्जेराव रोडे सरपंच होते. गुलाब रामफळे हे सलग पाच वर्षे उपसरपंच होते. रोडे व मोरे हे एकमेकांचे जवळचे नातलग आहेत. या ठिकाणी सोयरेधायरे व भावकीमुळे रंगतदार लढती होत आहेत. दोन्ही पॅनलचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांचे समर्थक आहेत. अंकुश रोडे हे प्रभाग एकमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर सरपंच सर्जेराव रोडे यांच्या पत्नी अर्चना रोडे प्रभाग दोनमधून निवडणूक लढवत आहेत.