सर्व्हेत दिलीप गांधी पिछाडीवर, म्हणून सुजय यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 08:01 AM2019-03-31T08:01:26+5:302019-03-31T08:01:57+5:30
भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट
मुंबई : उमेदवारी देत असताना आम्ही लोकांच्या मतांचा विचार करतो. नगरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात विद्यमान खा. दिलीप गांधी यांच्याविषयी नाराजी असल्याचे लक्षात आले. तीन सर्वेक्षणांमधून हीच गोष्ट समोर आली. त्यातच सुजय यांना उमेदवारी हवी होती. मात्र तो मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांना तिकीट मिळत नव्हते. त्यामुळेच आम्ही त्यांना उमेदवारी दिली, अशी माहिती भाजपचे संकटमोचक व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. लोकमत फेसबूक लाईव्हमध्ये मुलाखत देताना ते बोलत होते.
माझ्याकडे दिलेल्या जबाबदाऱ्यांना मी न्याय देत आहे. माझ्याकडे अनेक महत्त्वाची खाती आहेत. त्यात मी आनंदी आहे. मुख्यमंत्री होण्याचा कोणताही विचार नाही आणि तो कधीही मनात आलेला नाही, असं उत्तरही महाजन यांनी दिले. मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक अशी तुमची ओळख आहे. आपण स्वत: मुख्यमंत्री व्हावे, असा विचार कधी डोक्यात आला का?, असा प्रश्न लोकमत फेसबुक लाईव्हमध्ये एका चाहत्याने विचारला होता, त्यावर महाजन बोलले.
दोन्ही काँग्रेसमधील नेते पक्ष प्रवेश करण्याच्या आधी तुमचीच भेट का घेतात, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी सगळे तुमच्याशी चर्चा का करतात, असे प्रश्नही महाजनांना विचारण्यात आले. त्यावर महाजन यांनी गमतीशीर उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाताना माझा बंगला लागतो. माझा बंगला आधी येत असल्याने ही नेतेमंडळी आधी माझ्याकडे येत असावीत, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.
भाजपचे सरकार आल्यानंतर मोर्चे, आंदोलनाचे प्रमाण वाढले. त्याचे कारण विचारल्यावर महाजन म्हणाले, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लोकांना सरकारकडून अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय संवेदनशील आहेत. ते प्रश्न समजून घेतात. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, म्हणून लोक मोर्चे घेऊन येतात असेही ते म्हणाले.