निसर्ग वैभव लाभलेलं फोफसंडी गावचा परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:23 AM2021-09-26T04:23:07+5:302021-09-26T04:23:07+5:30
अकोले : तालुक्यातील वायव्येला दुर्गम आदिवासी भागातील कोंबडकिल्ला- कुंजीरगडाच्या पायथ्याशी वसलेले अन अभिजात निसर्ग वैभव लाभलेले फोफसंडी गाव परिसर ...
अकोले : तालुक्यातील वायव्येला दुर्गम आदिवासी भागातील कोंबडकिल्ला- कुंजीरगडाच्या पायथ्याशी वसलेले अन अभिजात निसर्ग वैभव लाभलेले फोफसंडी गाव परिसर वन भटकंतीसाठी पर्यटकांना खुणावत आहेत.
सह्याद्री गिरीकंदरातील चौफेर डोंगरामध्ये दरीत वसलेली गाव फोफसंडी, गावक-यांना उशिराने सूर्यदर्शन होते तर सायंकाळी थोडे लवकर अंधारून येते, असे निसर्ग लेणं लाभलेले अप्रतिम गाव. येथील परिसर आता रानफुलांनी बहरला आहे. पावसाळ्यात जलोत्सव, त्या अगोदर काजवा महोत्सव, नवराञात फुलोत्सव असा अकोले तालुक्यात निसर्ग बहरतो.
तालुक्यात छोटे मोठे जवळपास २६ गडकिल्ले असून हरिश्चंद्रगड, रतनगड, विश्रामगड, बित्तमगड, कुंजीरगडसह तालुक्यातील आदिवासी भागात रानफुलांचा फुलोत्सव सुरू झाला आहे. पिवळी धमक सोनकीची फुल गड माथ्यावर बहरली आहेत. आभळी निभाळी, रानतेवडा, रानओवा, सप्तरंगी घाणेरीची फुले डोलू लागली आहेत.
कोंबडकिल्ला परिसरातील निसर्ग रानफुलांनी असाच बोलका केला आहे. ब्रिटिश अधिकारी पोप याचे हे आवडते गाव, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात तो दर रविवारी या गावात येत म्हणून गावाला फोफसंडी नाव मिळाले, असे गावकरी सांगतात. सहा-सात वर्षांपर्यंत त्या इंग्रज अधिकाऱ्याचा बंगला सुस्थितीत होता.
मांडवी नदीच उगमस्थानी हे गाव असून ही नदी पुणे जिल्ह्यात प्रवाहित असते. येथे दर्याबाईचे मंदिर असून मांडव्यगण ऋषींनी येथील गुहेत तपश्चर्या केली आहे. फोफसंडी येथे कुंजीरगड, घारीचा, भद्र्याचा, कवड्याचा, चोहंडीचा, माऊल्याचा व धुळगडीचा धबधबा, फडईचा, रांजणीचा व बाळूबाईचा डोंगर, दर्याबाई, राणूबाई, कळमजाई मंदिरे, दौंड्याची, गहीण्याची, चारण व घोड गडद, मानखांदा व गायदरा, टकोराची खिंड, निखळीची टेकडी, वारल्याचा कडा, नळीचे, केमसावण्याचे, पाखराचे पाणी, उंबारले आदि ठिकाणे पहाण्यासारखी आहेत. गुहांमध्ये गावरान डांगी जनावरे व गोपालक राहतात.
....................
वनसंपदा मुबलक
या परिसरात हिरडा वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. गत वर्षी कोविड काळात येथील आदिवासींनी जवळपास दीड कोटींचा हिरडा गोळा करून विकला. या भागात वन भटकंती करताना महाराष्ट्राचा मानबिंदू शेकरू आपले स्वागत करतात. सांबर, हरीण, रान डुक्कर हे वन्य प्राणी आढळतात.
..................