कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:26 AM2021-04-30T04:26:27+5:302021-04-30T04:26:27+5:30
अहमदनगर : दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संसर्ग थांबविण्याच्या ...
अहमदनगर : दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संसर्ग थांबविण्याच्या दृष्टीने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत कुटुंबाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. आरोग्य पथक प्रत्येकाच्या घरी जाऊन कोरोनाची लक्षणे या मोहिमेत तपासणार आहेत. त्याचबरोबर संशयितांना लगेच विलगीकरण कक्षात दाखल करणार आहेत.
विभागीय आयुक्तांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार २८ एप्रिल ते २ मार्च या दरम्यान ही मोहीम चालणार आहे. मागील वर्षीही ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’अंतर्गत कुटुंबांचे सर्वेक्षण करून कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना वेळेत विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार झाले आणि कुटुंबातील इतरांना होणारा संसर्ग आटोक्यात आला; परंतु या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. त्यातून रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावली आहे. आगामी रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने पुन्हा ही मोहीम राबविण्याचे शासनाने ठरवले आहे. त्याअंतर्गत आरोग्य पथकाद्वारे गृहभेटी देऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याची माहिती गोळा केली जाईल. त्यामध्ये तापमान, ऑक्सिजन पातळी, खोकला, दम लागणे पल्स रेट किंवा इतर कोरोनाची लक्षणे आहेत का याची तपासणी केली जाईल. जर अशी लक्षणे असतील तर अशा रुग्णांची रॅपिड अँटिजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवले जाईल. या यादीतील व्यक्तींची त्यादिवशी टेस्ट करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची असेल. गावाची कुटुंब संख्या विचारात घेऊन सात दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत सूचना आहेत.
--------------
गुणवत्तेबाबत सक्त सूचना
या मोहिमेतील सर्वेक्षण अचूक व्हावे याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. सर्वेक्षणासाठी एखादा दिवस उशीर झाला तरी चालेल; परंतु सर्वेक्षणाची गुणवत्ता चांगली असली पाहिजे, अशा सक्त सूचना प्रशासनाने या पथकांना दिल्या आहेत. या पथकात एक आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि एका शिक्षकाचा समावेश आहे.
-------------
ग्रामपंचायतीने साहित्य पुरवावे
या सर्वेक्षणासाठी लागणारे ऑक्सिमीटर, थर्मल गण आणि सर्वेक्षणाची माहिती गोळा करण्यासाठी लागणारे रजिस्टर ग्रामपंचायतीने पुरवावे. त्याबाबत संबंधित तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा विभागीय आयुक्तांना सूचना आहेत.
-------------
लवकर निदान-लवकर उपचार
लवकर निदान-लवकर उपचार हा या सर्वेक्षणाचा हेतू आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या सर्व व्यक्ती या सर्वेक्षणातून बाहेर येतील आणि कोरोना साखळी तोडण्यासाठी मदत होईल, या दृष्टीने सर्व यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.