पाच कर्मचारी निलंबित
By Admin | Published: May 15, 2014 11:10 PM2014-05-15T23:10:36+5:302024-01-17T17:37:27+5:30
अहमदनगर : वर्षभरात ग्रामपंचायतीत दप्तर अपूर्ण ठेवणार्या, आर्थिक अनियमितता, आॅनलाईन रेकॉर्ड पूर्ण न करणार्या चार ग्रामसेवक
अहमदनगर : वर्षभरात ग्रामपंचायतीत दप्तर अपूर्ण ठेवणार्या, आर्थिक अनियमितता, आॅनलाईन रेकॉर्ड पूर्ण न करणार्या चार ग्रामसेवक आणि राहुरी पंचायत समितीचा एक कनिष्ठ साहाय्यक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी ही कारवाई केली आहे़ ग्रामपंचायत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील बी.बी. वाहूरवाघ आणि बी. के. बागूल यांनी नेमणुकीच्या ठिकाणी असणार्या ग्रामपंचायतीत संग्राम कक्षात आॅनलाईन माहिती भरलेली नाही. तसेच ते नेमणुकीच्या मुख्यालयात राहत नव्हते. त्यांनी आॅनलाईन माहिती न भरल्याने त्या ठिकाणी मार्च एण्ड बंद करता आला नाही. याबाबत सुुरुवातीला गटविकास अधिकारी स्तरावरून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, उपयोग झाला नव्हता. पाथर्डी तालुक्यातील नांदूरनिंबा आणि कोळसांगवी या ग्रामपंचायतीत नेमणुकीस असणार्या एस.एस. दातीर यांनी आॅडिटसाठी ग्रामपंचायतींची माहिती उपलब्ध करून दिली नाही. तसेच अंगणवाडी इमारतीच्या कामात अनियमितता केलेली आहे. आॅनलाईन दाखले भरलेले नाहीत. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील दिलीप मुरलीधर कपिले याने बदली झाल्यानंतरही दोन वर्ष ग्रामपंचायतीचे दप्तर हस्तांतरण केलेले नव्हते. यामुळे या चारही ग्रामपंचायत कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. राहुरी पंचायत समितीत बालकल्याण विभागातील कनिष्ठ साहाय्यक विजय तुपे याने अन्य कर्मचार्यांचे वेतन त्यांच्या बँक खात्यावर वर्ग न करता, स्वत:च्या खात्यावर वर्ग केल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)