निलंबित पैठणकर पुन्हा आला पालिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:37 AM2021-02-18T04:37:41+5:302021-02-18T04:37:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : सांख्यिकी अधिकारी म्हणून रूजू झालेला नरसिंह पैठणकर पुढे महापालिकेत घनकचरा प्रमुख झाला. शहरातील कचरा ...

Suspended Paithankar returned to the municipality | निलंबित पैठणकर पुन्हा आला पालिकेत

निलंबित पैठणकर पुन्हा आला पालिकेत

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : सांख्यिकी अधिकारी म्हणून रूजू झालेला नरसिंह पैठणकर पुढे महापालिकेत घनकचरा प्रमुख झाला. शहरातील कचरा संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच बायो मेडिकल वेस्ट, बायोगॅस, आणि मृत जनावरे विल्हेवाट लावणे, असे मोठे प्रकल्प पैठणकरच्या अखत्यारित होते. या प्रकल्पांची किंमत काही कोटींच्या घरात आहे. शासन नियमांची भीती दाखवून पैठणकर हा प्रकल्प मालकांकडून मलिदा लाटत होता. परंतु, लाचलुचपत पथकाकडे केलेल्या एका तक्रारीने त्याचे बिंग फुटले आणि पैठणकर हा एका कचरा डेपोतच पैसे घेताना पथकाच्या जाळ्यात अडकला. हे पैसे त्याने एकट्यासाठी घेतले की आणखी कुणासाठी हे तपासात समोर येईल. पण, त्याच्यावरील या कारवाईने महापालिकेत चांगलीच खळबळ उडाली आहे.

मुळाचा परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेला नरसिंह पैठणकर हा सांख्यिकी अधिकारी म्हणून महापालिकेत रूजू झला होता. दरम्यान, महापालिकेमार्फत त्याने परीक्षा दिली. या परीक्षेत पास झाल्याने त्याला पदोन्नती मिळाली. ही परीक्षा देण्यासाठी घेतलेली त्याची रजाही वादात सापडली. कालांतराने यावरही पडदा पडला. पैठणकर हा महापालिकेत उपआरोग्यधिकारी म्हणून काम पाहू लागला तेव्हापासून पैठणकर एकाच घनकचरा विभागाचे काम पाहत होता. सभागृहात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्यात पैठणकर हा चांगलाच पटाईत आहे. पुढे या कारणामुळेच तो वादग्रस्त ठरला. घनकचरा विभागाला शासनाकडून मोठा निधी मिळतो. या निधीतून कचरा वाहतुकीपासून ते प्रक्रिया करणे, ही सर्व कामे केली जातात. या कामांचे बिल अदा करण्यासाठी लागणारे प्रस्ताव वेळेत सादर न करणे, त्यात त्रुटी काढणे, याबाबी वेळाेवेळी समोर आल्या. मागील वर्षी सावेडी कचरा डेपोला आग लागली. ही आग विझविण्यातही त्याने दिरंगाई केली तसेच वाहन खरेदीसह खत प्रकल्पांचे प्रस्ताव त्याने वेळेत दिलेले नव्हते. एकूण पैठणकर यांचे काम असमाधानकारक असल्याने त्यांला तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी निलंबित केले होते; परंतु, पदाधिकाऱ्यांकडे विनवण्या करून पैठणकर पुन्हा पालिकेत हजर झाला. लॉकडाऊनच्या काळात त्याने आयुक्तांसह पदाधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. काही पदाधिकाऱ्यांशी हताशी धरून तो पुन्हा घनकचरा प्रमुख झाला. निलंबित झाल्याने कामात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती परंतु, इतरांप्रमाणेच त्यानेही आपला रंग पुन्हा दाखविण्यास सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्य शाम नळकांडे यांनी मैला वाहतुकीबाबत प्रश्न उपस्थित केला हाेता. पण, याही प्रश्नाचे त्याने सरळ उत्तर दिले नाही. वेळ मारून नेली. सभागृहाला चुकीची माहिती दिल्याने पैठणकरला निलंबित करण्याची माणगी सदस्यांनी केली. परंतु, सभापती मनोज कोतकर यांनी कुणाचे कुटुंब उद्‌ध्वस्त करायला नको, म्हणून कारवाई करणे टाळले. ही घटना ताजी असतानाच पैठणकर लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात अडकला.

.....

आठ दिवसांपासून पथक होते पैठणकरच्या पाळतीवर

महापालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोत मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘निरा’ पथकाने या प्रकल्पाबाबत त्रुटी काढल्या. या त्रुटी दूर करून बिल अदा करण्यासाठी पैठणकर याने पाच लाखांची मागणी केली होती. यापैकी अडीच लाख रुपये देण्याचे ठरले. पण, ठिकाण व वेळ पैठणकर वेळोवेळी बदलत होता. त्यामुळे लाचलुचपत विभागाचे पथक गेल्या आठ दिवसांपासून पैठणकरवर पाळत ठेवून होते.

Web Title: Suspended Paithankar returned to the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.