नगर जिल्हा रुग्णालयातील चौघांचे निलंबन : पांगरमल दारुकांड भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:11 AM2017-12-06T11:11:24+5:302017-12-06T11:14:54+5:30
जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, तत्कालीन ईएनटी सर्जन, तत्कालीन प्रशासन अधिकारी तसेच सध्याचे प्रशासन अधिकारी अशा चार अधिका-यांचे मंगळवारी सायंकाळी निलंबन करण्यात आले. मंत्रालयातून उशिरा निलंबनाचा आदेश मिळाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग बरुटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
अहमदनगर : येथील जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, तत्कालीन ईएनटी सर्जन, तत्कालीन प्रशासन अधिकारी तसेच सध्याचे प्रशासन अधिकारी अशा चार अधिका-यांचे मंगळवारी सायंकाळी निलंबन करण्यात आले. मंत्रालयातून उशिरा निलंबनाचा आदेश मिळाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग बरुटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एस. एम. सोनवणे, तत्कालीन ईएनटी सर्जन डॉ. पी. एस. कांबळे, तत्कालीन प्रशासन अधिकारी डॉ. संजय राठोड तसेच सध्याचे प्रशासन अधिकारी डॉ. रमेश माने या चार अधिका-यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले. या निलंबनाचा आदेश जिल्हा रुग्णालयाला मिळाला असल्याचे डॉ. बरुटे यांनी सांगितले. पांगरमल दारुकांडात वापरण्यात आलेली दारु जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये तयार करण्यात आली होती. या कॅन्टीनचा ठेका चालविण्यास देताना संबंधित अधिका-यांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पांगरमल दारुकांडाला जबाबदार धरुन तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. सोनवणे रजेवर गेल्यानंतर व त्यापूर्वीही ईएनटी सर्जन डॉ़ पी. एस. कांबळे यांच्याकडे जिल्हा रुग्णालयाची प्रभारी सुत्रे देण्यात आली होती. त्यानंतर कांबळे यांची औंध येथे बदली करण्यात आली़ तर डॉ़ संजय राठोड हे जिल्हा रुग्णालयात प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांचीही औंध येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर डॉ. रमेश माने हे प्रशासन अधिकारी म्हणून येथील जिल्हा रुग्णालयात रुजू झाले. मात्र, प्रशासकीय कारभार न सुधारल्यामुळे माने यांचेही निलंबन करण्यात आले आहे.