नेवाशातील भाजपच्या दोन नगरसेवकांचे पक्षातून निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:02+5:302021-09-26T04:24:02+5:30
नेवासा : नगर पंचायतीमधील भाजपकडून निवडून आलेले नगरसेवक रणजित दत्तात्रय सोनवणे व दिनेश प्रताप व्यवहारे यांना पक्षातून निलंबित करण्यात ...
नेवासा : नगर पंचायतीमधील भाजपकडून निवडून आलेले नगरसेवक रणजित दत्तात्रय सोनवणे व दिनेश प्रताप व्यवहारे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दोघांवर पक्षविरोधी कामाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. तसे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिले आहे.
नगर पंचायतीची दुसरी निवडणूक एप्रिल २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहर व तालुका भाजपच्या तीन बैठका झाल्या आहेत. त्यात प्रभागनिहाय अभ्यास व संपर्क सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नेवासा तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब फुलारी यांनी त्यांची निवड झाल्यावर शहराध्यक्ष यांच्यासह काही चिटणीसांचे पक्षातून निलंबन केले होते. त्यानंतर आता दोन नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे.
२०१७ च्या नगर पंचायतीच्या पहिल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १५ मधून निवडून आलेले दिनेश व्यवहारे व प्रभाग क्रमांक ९ मधून केवळ एका मताने निवडून आलेले रणजित सोनवणे या दोघांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.
-----
पक्षाच्या कार्यक्रमांनाच गैरहजर
वेळोवेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून निरोप येऊनही पक्षाच्याच कार्यक्रमात उपस्थित न राहता विरोधकांच्या प्रत्येक कार्यक्रमात हे दोघेही उपस्थित राहत होते. पक्ष संघटना वाढीसाठी या दोघांनी अजूनही त्या अनुषंगाने कोणतेही काम केलेले नाही. तसेच पक्षविरोधी काम चालूच असल्याने गंभीर दखल घेऊन पक्षाने स्थानिक नेत्यांशी चर्चा करून दोघा नगरसेवकांना निलंबित केले आहे, असे गोंदकर यांनी म्हटले.