विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Published: May 23, 2014 01:20 AM2014-05-23T01:20:26+5:302014-05-23T01:28:03+5:30
कोतूळ / राजूर : विवाहितेच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने आदिवासी समाजाने अंत्यविधी करण्यास नकार दिला.
कोतूळ / राजूर : विवाहितेच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने आदिवासी समाजाने अंत्यविधी करण्यास नकार दिला. या प्रकारामुळे कोहणे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांच्या कारवाईनंतर नऊ तासांनी प्रचंड जनक्षोभात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत माहिती अशी, कोहणे गावातील बापू सोमा लांडे यांची मुलगी मनिषा (वय २२) हिचा विवाह गावातील संजय सखाराम सारोक्ते यांच्याशी झाला होता. पुण्यात खासगी कंपनीत काम करणार्या संजय सारोक्ते यांनी घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणावेत असा तगादा मनिषाकडे लावला होता. लग्नानिमित्त कोहणे येथे आलेले पती-पत्नी १३ मे रोजी पुण्यास परतले. दुसर्या दिवशी स्टोव्हच्या भडक्याने मनिषा भाजल्याचा फोन आल्याने माहेरची मंडळी पुण्याला गेली. ससून रूग्णालयात उपचार सुरू असताना मनिषा हिस १८ रोजी के.ई.एम.(मुंबई) रूग्णालयात हलविण्यात आले. के.ई.एम. रूग्णालयात मनिषाला भेटून आई व चुलते २१ रोजी पुन्हा गावी येण्यास निघाले. कसार्यानजीक येताच मनिषाचा मृत्यू झाल्याचा निरोप आला. गुरूवारी सकाळी मृतदेह कोहणे येथे आणण्यात आला. मनिषाच्या मृत्युबद्दल संशय आल्याने नातेवाईक राजूर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र घटना जेथे घडली, तेथेच तक्रार द्या, असे पोलिसांनी सुनावताच मयताचे नातेवाईक संतप्त झाले. या घटनेने कोहणे गावात जनक्षोभ उसळला. हे पाहून मयताचा पती संजय, त्याचा भाऊ, भावजय आदी गावातील एका खोलीत लपून बसले. वातावरण तणावपूर्ण बनल्याने संगमनेर व अकोले येथून पोलिसांचा मोठा फौजफाटा कोहणे गावात येऊन धडकला. पोलीस निरीक्षक अशोक खंदारे यांनी जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला. राजूरचे उपनिरीक्षक राहुल पाटील हे घटनास्थळी येताच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. यावेळी तरूणांनी मयताचा पती संजय सारोक्तेसह इतरांना खोलीतून बाहेर काढून बेदम चोप दिला. अखेर पोलिसांनी संजय सारोक्ते, शरद सखाराम सारोक्ते, माधुरी शरद सारोक्ते व कचरे(पूर्ण नाव माहीत नाही) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर वातावरण शांत झाले. तब्बल नऊ तासांनी विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)