मळगंगेच्या जयघोषात घागर मिरवणूक

By Admin | Published: May 2, 2016 11:17 PM2016-05-02T23:17:27+5:302016-05-02T23:31:05+5:30

पारनेर : निघोज येथील मळगंगा देवीच्या घागर मिरवणूक सोहळ्याला लाखो भाविकांनी हजेरी लावून मळगंगेचा जयजयकार केला़

Swarm procession in the auspicious night of Malganga | मळगंगेच्या जयघोषात घागर मिरवणूक

मळगंगेच्या जयघोषात घागर मिरवणूक

निघोज यात्रा : मळगंगा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची हजेरी
पारनेर : निघोज येथील मळगंगा देवीच्या घागर मिरवणूक सोहळ्याला लाखो भाविकांनी हजेरी लावून मळगंगेचा जयजयकार केला़
निघोज येथील मळगंगा देवीच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ झाला़ शनिवारी सकाळी पुजारी ठकाराम गायखे, सुनील गायखे यांनी महाअभिषेक केला. सकाळपासूनच राज्यभरातून आलेल्या भाविकांनी मळगंगा देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यात्रेचे नियोजन देवस्थानचे अध्यक्ष बाबाशेठ कवाद, प्रभाकर कवाद, शांताराम लंके, सचिव बबन ढवण, महेश ढवळे आदींनी केले. शनिवारी रात्री निघोजमध्ये पालख्यांचे स्वागत करण्यात आले. रविवारी सकाळी मळगंगा देवीची घागर मिरवणूक मंदिरापासून निघाली. शहराच्या मुख्य पेठेतून ही मिरवणूक सुमारे दोन तासाने बारवेजवळ पोहोचली़ भाविकांनी केलेल्या मळगंगेच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. घागर मिरवणूक व पालखी सोहळ्याचे ठिकठिकाणी डिजिटल फलकावर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते़ यात्रेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून तहसीलदार भारती सागरे, पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर, उपनिरीक्षक अहिरे व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चंद्रकांत लामखडे, अमृता रसाळ, रामदास वरखडे यांच्यासह सरपंच ठकाराम लंके, उपसरपंच बाबाजी लंके आदींनी यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी परिश्रम घेतले़
(तालुका प्रतिनिधी)
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून निघोज ग्रामीण पतसंस्थेसह सर्व सामाजिक संघटना व तरुण मंडळांनी ठिकठिकाणी पाणपोई सुरू केल्या होत्या़ त्यामुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावली नाही़
भर उन्हात आलेल्या भाविकांना विविध ठिकाणी सुरु केलेल्या पाणपोई दिलासादायक ठरल्या़ निघोजमध्ये सुरु केलेल्या या पाणपोर्इंवर मोठी गर्दी होत होती़
भाविकांना स्थानिक टारगटांचा त्रास
निघोज येथील यात्रेसाठी आलेल्या भाविकांना रविवारी रात्री बाजारतळ परिसरात वाहने लावण्यावरून काही स्थानिक टारगटांनी दमबाजी करण्याचा प्रयत्न केला़ पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे यांनी लगेच घटनास्थळी जाऊन टारगटांना समज दिली़
भाविकांची कुंडावरही मोठी गर्दी
रविवारी सकाळी घागर मिरवणूक झाल्यानंतर दुपारपासूनच रांजणखळगे, कुंड या पर्यटनस्थळावरील गर्दीचा ओघ वाढला़ सोमवारी दिवसभर राज्यभरातून कुंड पर्यटन क्षेत्राकडील यात्रेत भाविकांनी सहभाग घेतला़ यात्रेत खेळण्यांसह विविध वस्तुंची दुकाने थाटण्यात आली होती. यात्रेत विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंदही भाविकांनी लुटला़

Web Title: Swarm procession in the auspicious night of Malganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.