रस्ता दुरुस्तीसाठी काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:37 PM2019-12-02T15:37:56+5:302019-12-02T15:38:19+5:30
नेवासा-शेवगाव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. याबाबत दोन वेळेस निवेदन देऊन ही बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने छत्रपती युवा सेनेने सोमवारी तालुक्यातील सौंदळा येथे बांधकाम विभागाचीच प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून बांधकाम विभागाचा निषेध केला.
नेवासा : नेवासा-शेवगाव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. याबाबत दोन वेळेस निवेदन देऊन ही बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने छत्रपती युवा सेनेने सोमवारी तालुक्यातील सौंदळा येथे बांधकाम विभागाचीच प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून बांधकाम विभागाचा निषेध केला. प्रतिकात्मक प्रेतावर रस्त्याच्या कडेलाच अग्नीडाव देवून अनोखे आंदोलन केले.
नेवासा-शेवगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेकदा या रस्त्यावर अपघात होत आहेत. याबाबत बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत आसल्याने वाहनधारकांत संताप व्यक्त होत आहे. या अगोदर छत्रपती युवा सेनेने उपोषणाचे निवेदन देवूनही बांधकाम खात्याने दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी सौंदळा येथे प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढल्याने झोपलेल्या बांधकाम खात्याला जाग आली. यावेळी छत्रपती युवा सेनेचे प्रदेश संघटक नवले यांनी सात दिवसांत रस्त्याचे काम झाले नाहीतर बांधकाम खात्याच्या कार्यालयातच दशक्रियाविधी करण्याचा इशाराही दिला.
याप्रसंगी सरपंच शरद अरगडे, नरेंद्र नवथर, निलेश कडू, कृष्णा नवथर, गणेश नवथर, बाबासाहेब सरकाळे, तालुकाध्यक्ष पप्पू बोधक, अक्षय बोधक, संदेश बोधक, ज्ञानेश्वर गव्हाणे, मनोज आरगडे, विजय नवले, विशाल शिंदे, संकेत बोधक, भेंडा शहर अध्यक्ष अविनाश गाडेकर, सागर कोतकर, अक्षय आरगडे, प्रसाद पाटोळे, गणेश आरगडे, सिद्धार्थ आरगडे, चंद्रकात आरगडे, अभिजीत बोधक, नितीन आरगडे, गणेश चित्ते, संदीप लोनकर, संजय बोधक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
छत्रपती युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन करताच बांधकाम खात्याला जाग आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सात दिवसात करण्यात येईल, असे आश्वासन बांधकाम विभागाचे हेमंत शेवाळे यांनी दिले.