सह्दय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 05:38 PM2019-05-12T17:38:15+5:302019-05-12T17:38:27+5:30
पत्रकारिता आणि सामाजिक कामामुळे गेली ३० वर्षे मला यशवंतराव गडाख साहेबांचा स्नेह - सहवास मिळाला. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाने मी विद्यार्थी दशेत भारावलो होतो.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दलच्या अविस्मरणीय आठवणी सांगणारा विशेष लेख...
अहमदनगर : पत्रकारिता आणि सामाजिक कामामुळे गेली ३० वर्षे मला यशवंतराव गडाख साहेबांचा स्नेह - सहवास मिळाला. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाने मी विद्यार्थी दशेत भारावलो होतो. दहावीच्या परीक्षेत ८० टक्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा तेव्हाच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असणाºया साहेबांनी गौरव सोहळा आयोजिला. जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सातारा जिल्ह्यातील स्व. यशवंतराव चव्हाण यांचे निकटवर्तीय असणारे ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी प्रमुख अतिथी आणि वक्ते होते. व्यासपीठावर साहेबांसोबत रामनाथ वाघ, जनुभाऊ काणे असे मान्यवर होते. या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाणांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र आणि भारताला दिलेल्या योगदानाबद्दल गडाख साहेब नेमकेपणाने बोलले. या कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला यशवंतरावांचे कृष्णकाठ हे आत्मचरित्र सप्रेम भेट मिळाले. मला साहेबांनी स्वाक्षरी असलेले एक उत्तम पुस्तक भेट मिळाल्याचा विलक्षण आनंद झाला. पुढील तीन चार दिवसात कृष्णाकाठ माझे वाचून पूर्ण झाले. माझ्या कुटुंबातील मागील पिढ्यांचा स्वातंत्र्य चळचळींशी धागा जोडलेला होता. आईचे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि नंतरचे काँग्रेसी. परंतु आणीबाणीत १९७५ ते ७७ मामा (मधु दंडवते) इंदिरा बाईंच्या कृपेने मिसा कायद्याखाली बंगलोरच्या तुरूंगात कैदेत होते. या काळात आमचे घर आणीबाणीच्या विरोधातील चळवळीचे केंद्र बनले. या काळात दुर्गा भागवत ते एस. एम. अण्णा असे सर्वजण आमच्या घरी येत असत. यशवंतराव चव्हाणांनी बाईंविरूध्द बंड करून मराठी बाणा दाखवायला पाहिजे, ते आणिबाणीविरूध्द मौन ठेवतात, असले बरेच काही ऐकत आलो. त्यामुळे चव्हाण साहेबांविषयी बरेच सकारात्मक भाव होते. कृष्णाकाठ वाचून आणि गडाख साहेबांचे भाषण ऐकूण यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाची महती मला उमजली. समंजस आणि सुसंस्कृत बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी रोज दर्जेदार पुस्तकांची काही पाने तरी वाचली पाहिजेत, तसे गडाख साहेबांनी सांगितले. हा संदेश प्रेरक ठरला. आजही प्रत्येक दिवाळीत उत्तमोत्तम दिवाळी अंक आणि वाचनीय पुस्तकांचा फराळ साहेब आवर्जून पाठवितात. आज ३६ वर्षांनंतरही अलमारीतील कृष्णकाठ अवचित हाताशी लागले की, गडाख साहेबांनी चव्हाण साहेबांचा सुसंस्कृतपण तपशीलात नमूद करणारा विद्यार्थ्यांशी केलेला संवाद मला लख्ख आठवतो.
माझे शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक काम असे एकत्रच चालू होते. स्नेहालयाचे काम १९८९ मध्ये सुरू झाले. गडाख साहेबांनी त्यास भेट द्यावी, अशी माझी खूप इच्छा होती. मी पुढील महिन्यात येईन असे साहेबांनी १९९४ च्या नोव्हेंबर महिन्यात मला सांगितले. १२ डिसेंबरला त्यांचा निरोप आला. आहे का वेळ आपल्याला? मी खुदकन हसलो. कारण मला एवढ्या मोठ्या माणसाने अहो-जाहो घालणे वेगळे वाटले. साहेब नगरच्या औद्योगिक वसाहतीत आले. स्नेहालयाचा तेथे नव्याने उभा राहणारा संसार तोडका मोडका होता. येथील शंभरावर मुले मुली वाळूवर साहेबांसमोर जमली. एका लाकडी टिपॉयवर साहेब सहजतेने बसले. मी म्हटले की येथे खुर्च्या सध्या नाहीत. त्यावर साहेब म्हणाले की, त्याची गरज नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात मुलांची बडबड ते विजय नावाच्या एका हुशार मुलाने तालसूर लावून म्हटलेल्या कुसुमाग्रजांच्या दोन कविता साहेबांनी ऐकल्या. राई नावाच्या एका मुलीने आईची एक बोबडी कविता म्हटली. तिची आई एक महिन्यापूर्वीच श्रीरामपूर येथे एचआयव्हीने दगावली होती. साहेबांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्यांनी त्या मुलीला जवळ घेतले. स्नेहालयाचे काम आणि महिला व मुलांचे विविध प्रश्न यावर स्नेहालयाच्या युवा टीमशी साहेबांनी संवाद केला. अगदी सलग पाच - सहा तास साहेबांनी दिले. मुलांसोबत पिठलं - भाकरी खाली बसूनच खाल्ली. परिसरात फिरताना प्रकल्प नियोजनासाठी काही उपयुक्त सूचना त्यांनी दिल्या. त्या दिवशी, त्यावेळी त्यांच्या खिशात जेव्हढे पैसे होते ते चिल्लरसकट त्यांनी दिले. त्या रकमेपेक्षा त्यांनी पाठीवर ठेवलेला हात आणि तुम्ही माणुसकी जपणारे काम करीत आहात, हे शब्द मनोबल देऊन गेले. त्यांनतर आजअखेर कधीही भेटल्यावर आस्थेने साहेब पाठीवर हात ठेऊन कामाची हालचाल विचारत असतात. त्यांच्याशी बोलताना जाणवते की, वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संस्थेविषयी जे छापून येत असते, त्यांची साहेब नोंद ठेवतात. आस्थेचा धागा अखंड असतो.
साहित्य संमेलन आणि सामाजिक जाणीव
साहित्य संमेलने म्हणजे निव्वळ उधळपट्टी असे मानणारा एक लहानसा वर्ग आहे. संमेलने म्हणजे केवळ विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी असेही समजले जाते. परंतु नगरच्या साहित्य संमेलनात साहेबांनी समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी करून घेतले. लोकांना ठाऊक नाही परंतु अगदी झोपडपट्टी आणि लालबत्ती भागातूनही साहित्य संमेलनासाठी महिला याव्यात, त्यांना भोजनाची कु पने मिळावित, त्यांच्या बैठकीबाबत भेदभाव नसावा याबद्दल साहेबांनी व्यक्तिगत लक्ष घातले होते. नगरच्या सर्व सामाजिक संस्थांना त्यांनी एकत्र बोलावले. संमेलन म्हणजे तुमच्या कामाचा परिचय सर्व महाराष्ट्राला आणि देशाला करून देण्याची एक संधी आहे. तेव्हा पुस्तक प्रदर्शनासोबतच तुमची माहिती देणारे स्टॉल मोफत लावा, असे साहेबांनी सांगितले. या निमित्ताने स्नेहालयाला अनेक लोक जोडता आले. संमेलनाच्या खर्चातून शिल्लक राहणारी रक्कम तीन सामाजिक संस्थांना संमेलनाच्या समारोपात गडाख साहेबांनी जाहीर केली. त्यात स्नेहालयाचा प्रामुख्याने समावेश होता. स्नेहालयाच्या कामाविषयी या निमित्ताने साहेब मोजकेच पण महत्वाचे बोलले. त्यामुळे माध्यमांद्वारे स्नेहालयाचे काम सर्वदूर पोहोचले. नगरच्या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाचाही उध्दार झाला. जिल्हा सहकारी बँकेची धुरा अनेक वर्ष साहेबांनी सांभाळली. स्नेहालयासह, रावसाहेब पटवर्धन स्मारक, डॉ. आडकर ट्रस्ट, अनामप्रेम अशा निदान दोन डझन संस्थांना साहेबांनी सहकार सभागृह मोफत अथवा कमी शुल्कात उपलब्ध करून दिले. त्यांचे ऐकणाºया सहकारी - शिक्षण आणि व्यावसायिक आस्थापनांकडून अशा सामाजिक संस्थांना सर्व प्रकारची मदत साहेबांनी मिळवून दिली. रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीने बालकुमार साहित्य संमेलन अहमदनगरमध्ये भरवले ते केवळ साहेबांच्याच पाठबळावर. त्याचे उद्घाटक म्हणून साहेबांनी यावे असा आग्रह मी आणि अशोक कुरापट्टी यांनी धरला. परंतु बालकुमार साहित्यिकांना नगर जिल्ह्यात आणून आणि येथील उगवत्या पिढीला साहित्याशी जोडून तुम्ही माझेच काम करीत आहात. येथे तुम्ही आणि मी एकच आहे. असे सांगून साहेबांनी स्वत: यायचे टाळले. त्यांचा सत्कार करायचे संयोजकांनी ठरविले. तेव्हा ह्या निरर्थक गोष्टीत तुमचे पैसे आणि वेळ कशाला घालता, असा प्रतिप्रश्न करून तेही टाळले. आपल्या बळावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आपले नाव - गाव किंवा योगदानाचा उल्लेख कुठेही नसावा, याबद्दल दक्ष असणारा असा नेता विरळच. साहेबांची बहीण म्हणजेच ताईसाहेब कदम.
त्यांच्या स्मरणार्थ काही उपक्रम गडाख परिवार करतो. दोन वर्षांपूर्वी बेवारस बालके आणि बालमातांसाठी राबविल्या जाणाºया स्नेहांकुर या उपक्रमातील अनुभव सांगण्यासाठी माझी पत्नी डॉ. प्राजक्ताला बोलविण्यात आले. तेव्हा साहेबांसह त्यांचे सर्व कुटुंब पूर्णवेळ उपस्थित होते. साहेबांनी या कामाचे अंतरंग समजावून घेतले आणि अर्थपूर्ण मार्गदर्शन केले.
धीरोदात्त सुसंस्कृतता
एक पत्रकार म्हणून १९८३ मध्ये मी नगरच्या दैनिक लोकयुगमधून उमेदवारी सुरू केली. तेव्हापासून गडाख यांचे नेतृृत्व विकसित होताना मी पाहिले. समाचार, केसरी, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स आॅफ इंडिया, पी टी आय असा माझा ३५ वर्षांचा माध्यम प्रवास झाला. वर्ष २०१२ मध्ये स्नेहालयाच्या रेडिओ नगर ९०.४ एफ एम चॅनलकरिता मी साहेबांची सुमारे ८० मिनिटांची एक दीर्घ मुलाखत घेतली. पत्रकार म्हणून साहेबांशी केलेला हा शेवटचा अनौपचारिक संवाद होता. त्यावर लिहित होतो. आम्ही यशवंतराव चव्हाणांचे सुसंस्कृत राजकारण प्रत्यक्ष पाहिले अनुभवले नाही. पण ते कसे असावे याची झलक गडाख साहेबांच्या नेतृत्वशैलीतून अनुभवली.
१९९० नंतर राजकारणाची जी दुर्दशा होत गेली. त्यातून नितिमत्ता आणि ध्येयवादाचा जसजसा ºहास होत गेला, तस तसे गडाख साहेबांसारख्या विकासासाठी राजकारण ही भूमिका असणाºया माणसांची राजकारणातील जागा मर्यादित होऊ लागली. राजकारण म्हणजे व्यक्तिगत वैर किंवा सुडबाजी आणि खुनबाजी नव्हे, हे साहेबांनी नेहमीच तारतम्याने जाणले. त्यांचे वागणे विरोधकांसह सर्वांशीच उमदे राहिले. सतत राजकारण किंवा निवडणुकीचा हिशोब त्यांच्या डोक्यात कधीच नव्हता. लोकसभेच्या एका निवडणुकीत नगरच्या शासकीय अतिथीगृहात डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासोबत मी चहा पित बाहेरच उभा होतो. तेथे काँग्रेसचे उमेदवारी करणारे गडाख साहेब आले. त्यांना पाहून डॉ. सप्तर्षी म्हणाले की, तुम्ही आमची खूप गैरसोय केली आहे. बरेच कार्यकर्ते पळवलेत. यावर साहेब मिश्किलीने म्हणाले की, डॉ. साहेब मतांची सोडून कुठलीही गैरसोय मी दूर करीन. मला सांगा. त्यातही तुमची फार अडचण असेल तर वैयक्तिक मताची मदत मित्र म्हणून करू शकतो. पण हल्ली लोक कोणाचे ऐकूण कोणालाही मत देत नाहीत. ती गैरसोय राहणारच. त्यांनतर निवडणुकीतल्या गंमती जमतींवर हसत खेळत आम्ही गप्पा मारल्या. हे एकमेकांविरूध्दचे स्पर्धक उमेदवार आहेत, असे कोणाला सांगूनही खेरे वाटले नसते.
आपल्या किसन शिंदे या पानसवाडीच्या कार्यकर्त्याचा स्थानिक पुढाºयाने राजकारणातून केलेल्या खून प्रकारामुळे हळवे झालेले, अश्रू आवरू न शकलेले गडाख साहेब मी पाहिले. तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मारूतराव घुले आणि शंकरराव काळे यांना लोकांचे खून होणार असतील तर राजकारण सोडलेलेच बरे, असे उद्वेगाने आणि प्रांजळपणे म्हणणारे गडाख साहेब मला स्मरतात. दुसरा पुढारी असता तर एकाचा बदला दहाने घेणार अशी भूमिका ठेवून कार्यकर्त्यांना चेव आणला असता. परंतु सनदशीर, नेमस्त पध्दतीचे आणि आदर्शवादाकडे झुकणाºया राजकारणाचे गडाख साहेब प्रतिनिधी होते. हा यशवंतराव चव्हाणांचा वैचारिक वारसा होता. समाजवादी काँग्रेसचा सवता सुभा मांडलेल्या शरद पवारांना गडाख साहेबांनी १९८७ साली काँग्रेसमध्ये आणले. त्यापूर्वीच हिमालयात जाईन, पण काँग्रेसमध्ये नाही असे म्हणून बसलेल्या पवारांना शंकरराव चव्हाणांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून बसवण्यात गडाख साहेबांचीच मध्यवर्ती भूमिका होती. या कालखंडात गडाख साहेब सहजपणे राज्यात कॅबिनेट मंत्री होऊ शकले असते. परंतु मागून अथवा आत्मसन्मानाला ठेच पोहचवून सत्ता किंवा प्रतिष्ठा त्यांनी कधीच स्वीकारली नाही. आज नगर जिल्ह्यात तालुक्याचे पुढारी किंवा जातीचे पुढारी सुमार वकुब असताना मंत्री म्हणून मिरवताना दिसतात. गडाख साहेबानंतर झालेले खासदारही नगरपालिका किंवा ग्रामपंचायत स्तरावरचेच पुढारी वाटतात. खासदार हा देशाचे नेतृत्व करताना, त्याचा अभ्यास आणि देशाच्या नेतृत्वाला साजेसा असायला हवा. गडाख साहेबानंतर एकू ण नगर जिल्ह्यातील संसदीय नेतृत्वाची उंची घटली, हे निर्विवाद. गडाख साहेबांना न मिळालेल्या राजकीय संधीबद्दल एक पत्रकार म्हणून नेहमीच वाईट वाटते.
एका महत्वाच्या घटनेचा उल्लेख करायलाच हवा. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी काँग्रेसच्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना १९९१ ची निवडणूक गडाख साहेब लढले. ही निवडणूक आणि नंतरची कोर्टबाजी यात होरपळलेले गडाख साहेब, अशी साहेबांची संघर्षगाथा मला स्मरते. या निवडणुकीत दैनिक महाराष्ट्र टाईम्स करिता गडाख साहेबांची मी एक दीर्घ मुलाखत घेतली. एक संपूर्ण पान, आठ कॉलम असलेली ही मुलाखत प्रसिध्द झाल्यावर प्रचंड खळबळ उडाली.यात गडाख साहेबांनी स्व. विखे पाटील यांच्या काँग्रेस आणि राजीव गांधी यांच्या विरोधातील वैचारिक भूमिकेचा बुरखा फाडला.
सोयीनुसार भूमिका घ्यायची आणि माध्यमांच्या मदतीने त्याला तात्विक - वैचारिक मुलामा द्यायचा, या दांभिकतेला साहेबांनी नग्न केले. या निवडणुकीत प्रचंड प्रमाणावर पैशांसह सर्वच साधनांचा गैरवापर होत असल्याचा थेट आरोप साहेबांनी तपशीलवार संदर्भ देत केला. तसेच विरोधी गटाकडून त्यांच्याविरूध्द पिकविल्या जाणाºया गोष्टींचा त्यांनी समाचार घेतला. हे सर्व मी जसेच्या तसे, अनकट प्रसिध्द केले. त्यामुळे मोठा हलकल्लोळ उडाला. ती लढाई होतीच विलक्षण जीवघेणी.
एका मर्यादेच्या खाली उतरून राजकारण करता येत नाही, ही साहेबांची मर्यादा होती. ज्यांना काही करून जिंकायचेच होते, त्यांच्यासाठी सर्व मार्ग मोकळे होते. बरेच पुढारी पळून विरोधी गोटात गेलेले. काहीजण सोबत राहून हेरगिरी करणारे असे सर्वकाही सोसून धिरोत्तपणाने साहेब लहान कार्यकर्त्यांसोबत संघर्षात उभे राहिले. गडाख साहेबांचे प्रचंड प्रयत्न आणि मतदानाला ७२ तास उरले असताना २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची हत्या, त्यातून उसळलेली सहानुभूतीची लाट यामुळे बाजी पलटली. ११ हजार मतांनी साहेब जिंकले. परंतु हा पराजय जिव्हारी लागल्याने बाळासाहेब निकालाविरूध्द न्यायालयात गेले. यात औरंगाबाद उच्च न्यायालयात माझी प्रमुख साक्ष निघाली. माझ्या महाराष्ट्र टाईम्स मधील मुलाखतीत गडाख साहेबांनी केलेल्या आरोपांवर हा खटला बेतलेला होता. या सर्व राजकारणात सत्यता उघड होती. गैरप्रकार पुराव्यानिशी सिध्द करणे मात्र अवघड होते. माझी साक्ष निघाल्यावर मी अशी भूमिका घेतली की, मी जे ऐकले - छापले आणि पाहिले त्याच्याशी मी प्रामाणिक राहणार. याचा अर्थ असा की, साहेब जे बोलले ते बोलले असल्याचे मी न्यायालयात सांगणार. याचा परिणाम साहेबांची लोकसभेवरील निवड रद्द होण्यात होऊ शकतो, याची कल्पना आलेली होती. तेव्हाचे निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांच्या आचारसंहितेची कडक अंमलबजावणी देशभर सुरू झाली होती.
अशा स्थितीत काही लोक मला म्हणायचे की, जपून रहा, साक्षीदारांना काहीही होऊ शकते. परंतु या सर्व प्रकरणात गडाख साहेबांनी मला कधीही संपर्क केला नाही. मी काय साक्ष द्यावी, देवू नये याबद्दल कुठलाही आणि कसलाही दबाव त्यांनी टाकला नाही. उच्च न्यायालयात न्यायमूर्ती हळबे यांच्यासमोर चार दिवस माझी साक्ष आणि उलट तपासणी झाली. साहेबांची लोकसभेवरील निवड आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे न दिल्याने रद्द झाली. नंतरचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. या सर्व घटनांवरही गडाख साहेबांची माझ्याबद्दलची आणि आमच्या सेवाकार्याबद्दलची आस्था कधीही कमी झाली नाही. मनात कोणाविषयीही किल्मिश आणि पूर्वग्रह न ठेवण्यासाठी निर्मळ आणि क्षमाशील मन असावे लागते. केवळ अस्सल माणूसच अशी सह्दयता जपू शकतो.
राजीव राजळे यांचे निधन झाल्यावर राजकीय व्यवस्थेवर, अहोरात्र मत्सर आणि स्वार्थाचे राजकारण करणाºया पुढाºयांवर आणि राजकीय पक्षांच्या असंवेदनशीलतेवर गडाख साहेबांनी सार्वजनिक कोरडे ओढले. तो त्यांचाच अधिकार होता. असे धारिष्ट्य महाराष्ट्रात त्याआधी अथवा नंतरही कोणी दाखविले नाही.
सत्ताकारणाच्या परिचयातून बाहेर पडून साहेब आता समाजाच्या पालकत्वाच्या व्यापक भूमिकेतून गेले आहेत. राजकारणातील अभ्यासू वृत्ती आणि सुसंस्कृतपणाची पोकळी मात्र वाढतच चालली आहे.
- डॉ. गिरीश कुलकर्णी
(लेखक स्नेहालय या संस्थेचे संस्थापक आहेत)