विखेंच्या प्रवेशाने श्रीगोंद्यातील समीकरणे बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 06:48 PM2019-03-12T18:48:18+5:302019-03-12T18:48:29+5:30
डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्याने खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक नाराज झाले पण श्रीगोंद्यातील राजकिय समीकरणे बदलणार आहेत.
ब ळासाहेब काकडे श्रीगोंदा : डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्याने खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक नाराज झाले पण श्रीगोंद्यातील राजकिय समीकरणे बदलणार आहेत. याचे पडसाद तालुक्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर उमटणार आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते विरोधकांची मुठ बांधली होती. पवार विरोधक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही राहुल जगताप यांच्या मागे आपली फौज उभी केली होती. कुकडी कारखाना, नागवडे कारखाना, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, ग्रामपंचायत, सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पाचपुते विरोधकांनी हातात घालून काम केले. नगरपालिका निवडणुकीपासून आघाडीची मूठ काही प्रमाणात सैल झाली. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी पोटे यांची वर्णी लागली पण बहुमत मात्र भाजपाने मिळविले. शरद पवारांनी विखे यांना चेकमेट देण्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी अनुराधा नागवडे यांचे नाव पुढे केले. पवारांची रणनिती पाहून डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे खासदार दिलीप गांधी यांचे श्रीगोंद्यातील समर्थक नाराज होणे सहाजिकच आहे विखेंना मानणारे दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब गिरमकर, अॅड सुभाष डांगे, सिध्देश्वर देशमुख, बाळासाहेब नाहाटा यांनी भाजपात प्रवेश केला. पण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आण्णासाहेब शेलार हे जागीच थांबले आहेत. भविष्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या बरोबर अण्णासाहेब शेलार हे भाजपात जाण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीपासून बबनराव पाचपुते हे एकाकी पडले होते. विखेंच्या आगमनाने पाचपुतेंना नवी ऊर्जा मिळाली आहे. विखे सेना पाचपुतेंची जमेची बाजू ठरणार आहे. विखेंची ताकद मोठी असली श्रीगोंद्यात मताधिक्य मिळविण्यासाठी विखे सेनेची दमछाक अटळ आहे. आमदार राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे हे एकत्र आहेत. ते आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करतील. लोकसभा निवडणुकीसाठी अनुराधा नागवडे यांना पवारांनी शब्द दिला होता. त्यावर नागवडे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचे निश्चित केले पण जर चेकमेटच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीसाठी पवारांनी नागवडेंना डावलले. आगामी काळात नागवडेंची नाराजी दूर करणे पवार कुंटुबियांना अवघड जाणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमदार राहुल जगताप हे आपल्या भविष्याच्या दृदृष्टीने कसे डावपेच खेळतात, हे महत्वाचे ठरणार आहे.