ताई..... आपला आशिर्वाद असू द्या...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 05:19 PM2020-01-01T17:19:33+5:302020-01-01T17:19:58+5:30
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजश्री घुले यांनी सर्व सभागृहाला अभिवादन करत सहकार्याची विनंती केली़ त्यानंतर माजी अध्यक्षा शालिनी विखे यांचे चरणस्पर्श करीत घुले यांनी शालिनतेचे दर्शन घडविले़ तसेच ताई आपला आशीर्वाद असू द्या, असे आर्जव केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजश्री घुले यांनी सर्व सभागृहाला अभिवादन करत सहकार्याची विनंती केली़ त्यानंतर माजी अध्यक्षा शालिनी विखे यांचे चरणस्पर्श करीत घुले यांनी शालिनतेचे दर्शन घडविले़ तसेच ताई आपला आशीर्वाद असू द्या, असे आर्जव केले़
सभागृहात एकीकडे राजश्री घुले यांचा सत्कार सुरु होता तर दुसरीकडे त्यांचे पती चंद्रशेखर हे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत होते़ सर्वांशी हस्तांदोलन करीत सहकार्याची अपेक्षा करीत होते़ भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांचीही भेटघेत घुले यांनी सहकार्याची अपेक्षा केली़ अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत अर्ज मागे घेऊन सहकार्य केले़ पुढील काळात आम्हीही तुम्हाला सहकार्य करु़ सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करु, असे सांगत घुले यांनी वाकचौरे यांच्याकडे सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली़
घुले यांची निवड झाल्यानंतर त्यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले़ सदस्य, कार्यकर्त्यांकडून त्यांचा सभागृहात सत्कार होत असताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या़ हे आनंदाश्रू पुसत त्यांनी अनेकांचा सत्कार स्वीकारला़
-------------
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री दिलीप वळसे, मंत्री जयंत पाटील, शंकरराव गडाख, मंत्री सुभाष देसाई, आमदार अरुण जगताप, मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे या सर्वांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोलाची भूमिका निभावली. त्यामुळेच अध्यक्ष पदाची संधी मिळाली असून, महाविकास आघाडीतील सर्व मंत्री व आमदार यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद सदस्यांना सोबत घेऊन जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- राजश्री घुले, अध्यक्षा, जिल्हा परिषद
---------
महाविकास आघाडीतील सर्व नेते, काँगे्रस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व सर्व सदस्यांनी मला सहकार्य केले़ त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे़ जनतेच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे़
- प्रताप शेळके,
नूतन उपाध्यक्ष, जिल्हा परिषद