खटका पडला, शेपटी तुटली; घायाळ बिबट्याची शिकार झाली

By साहेबराव नरसाळे | Published: October 1, 2023 06:00 PM2023-10-01T18:00:58+5:302023-10-01T18:01:32+5:30

पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे ही घटना घडली.

tail broken a wounded leopard was hunted | खटका पडला, शेपटी तुटली; घायाळ बिबट्याची शिकार झाली

खटका पडला, शेपटी तुटली; घायाळ बिबट्याची शिकार झाली

साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : शिकार करण्यासाठी बिबट्या भक्ष्याच्या दिशेने धावला. पण भक्ष्य काही हाती येईना. म्हणून भक्ष्यावर पंजा मारत बिबट्या थेट पिंजऱ्यात पोहोचला. मात्र, पिंजऱ्यात हा बिबट्या मावेना. त्याची शेपटी पिंजऱ्याच्या बाहेरच राहिली. तेव्हढ्यात पिंजऱ्याचा खटका पडला. शेपटी तुटली अन् घायाळ बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे ही घटना घडली.

पाडळी येथील भिसे वस्ती लवण परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शुक्रवारी चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या प्रभाकर गर्जे, आदिनाथ गर्जे, महादेव आघाव, भारत भिसे, रामदास भिसे आदींना बिबट्याचे ठसे आढळले होते. याबाबत त्यांनी वन विभागाला कळविले त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी पिंजरा लावला होता. पूर्ण वाढ झालेला हा बिबट्या शुक्रवारी भक्षाच्या शोधात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यातील भक्ष्याची शिकार करण्यासाठी धजावला. तो पिंजऱ्याच्या बाजूने पंजे मारत होता. परंतु शिकार हाती येत नसल्याने तो पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूने आत शिरला. बिबट्या लांबलचक असल्याने तो पूर्णपणे पिंजऱ्यात बसला नाही. त्याची शेपटी बाहेरच राहिली. त्याचवेळी पिंजऱ्याचा खटका पडल्याने त्याची शेपटी तुटली. त्यामुळे बिबट्या घायाळ झाला आणि पिंजऱ्यात अडकला. 

तिसगावचे वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर, कर्मचारी व्ही. एम. गाढवे, विष्णू मरकड, एकनाथ खेडकर, अशोक कुसारे, कानिफ वांढेकर आदींनी शेतकऱ्यांच्या मदतीने बंदिस्त पिंजऱ्यातील बिबट्याला वाहनातून उपचारासाठी हलविले. हनुमान टाकळी, दिंडेवाडी, चितळी, पाडळी गावच्या सीमेवर वर्षभरापासून बिबट्याची मोठी दहशत होती. आता बिबट्या पकडल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Web Title: tail broken a wounded leopard was hunted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.