लोकसहभागातून प्रभागाची स्वच्छता टकाटक

By Admin | Published: February 18, 2016 11:18 PM2016-02-18T23:18:33+5:302016-02-18T23:25:00+5:30

अहमदनगर : नागरिक, नगरसेवक व महापालिका प्रशासन यांच्या समन्वयातून स्वच्छ शहर कसे साकारता येईल याचा वस्तुपाठ प्रभाग क्रमांक २१ ने घातला आहे.

Takatak cleanliness of the people through public participation | लोकसहभागातून प्रभागाची स्वच्छता टकाटक

लोकसहभागातून प्रभागाची स्वच्छता टकाटक

अहमदनगर : नागरिक, नगरसेवक व महापालिका प्रशासन यांच्या समन्वयातून स्वच्छ शहर कसे साकारता येईल याचा वस्तुपाठ प्रभाग क्रमांक २१ ने घातला आहे. नागरिकांचे प्रबोधन झाल्यामुळे या प्रभागातील नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकणेच बंद केले आहे. घंटागाडी नियमित असल्याने तिच्यातच कचरा टाकणे आता अंगवळणी पडले आहे. या प्रभागाचे नगरसेवक किशोर डागवाले यांनी ‘स्वच्छ प्रभाग’ हा आपला अजेंडाच ठरविला आहे.
नगर शहरात कचऱ्याची मोठी समस्या आहे. महापालिका प्रशासनाकडून नियमित कचरा उचलला जात नाही. त्यामुळे स्वच्छ शहर या संकल्पनेत नगर मागे पडले आहे. यावर लोकसहभागाने मात करण्याचा प्रयत्न काही प्रभागांनी सुरू केला आहे. प्रभाग २१ मध्ये नगरसेवक किशोर डागवाले यांनी घरोघर जाऊन नागरिकांना कचरा ‘डस्टबिन’मध्येच टाकण्याचे आवाहन केले. घरोघर हे डस्टबिनही वाटण्यात आले. प्रभागात होणारे हळदी-कुंकू, शिक्षक दिन, पाडवा मैफल, गणेशोत्सव, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अशा विविध समारंभात व उत्सवात प्रभागाची स्वच्छता हा विषय अजेंड्यावर असतो. त्याचे फळ आता दृष्टिपथास येऊ लागले आहे. प्रभागातील धनगरगल्लीत स्वातंत्र्य सैनिक स्व. एकनाथ शिंदे बालोद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानाची देखभाल करण्यासाठी महापालिकेचा कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने हे बालोद्यान देखील कचरामुक्त बनले आहे. घुमरे गल्ली, चित्रा गल्ली, कोर्ट गल्लीतील रस्ते करताना त्याकडेला वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांचे पालकत्व नागरिकांना देण्यात आले आहे. त्यामुळे प्रभागात वृक्षांची वाढ होऊ लागली आहे. हे वृक्ष भविष्यात प्रभागाच्या वैभवात भर टाकणार आहेत. वृक्षारोपण करताना लावलेले ट्री गार्ड चोरीस गेले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम नागरिकांनी सुरूच ठेवली. आता प्रभाग स्वच्छ दिसू लागल्याने आपण ‘स्वच्छ प्रभाग’ साकारु शकतो हा आत्मविश्वास येथील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. नागरिकांना स्वच्छतेची स्वयंशिस्तच लागली आहे. नागरिक आता घरातील कचरा रस्त्यावर अथवा घराबाहेर टाकत नाहीत. दुसऱ्यांनाही टाकू देत नाहीत. स्वच्छता कर्मचारी न आल्यास नागरिक थेट त्याला दूरध्वनी करून बोलावून घेतात. नगरसेवकांनाही फोन करून सांगतात. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी दांडी मारण्याचे धाडस करत नाही.
प्रभाग क्रमांक २१ हा शहराच्या मुख्य बाजारपेठेलगत पसरलेला आहे. बाजारपेठेत दिवसभर गजबज असली तरी रस्त्यावर मात्र कोठेच कचरा दिसत नाही. नागरिकांना स्वयंशिस्त लावण्यात यश मिळाले आहे. पूर्वी नागरिक रस्त्यावर कचरा टाकायचे. मात्र डस्टबिन दिल्यापासून रस्त्यावरील कचरा डस्टबिनमध्ये पडू लागला. डस्टबिन दिल्यामुळे प्रभाग स्वच्छतेला हातभार लागला आहे. शिवाय साफसफाई कर्मचाऱ्यांकडून झाडलोट झाल्याची माहिती घेतो. कोणाची तक्रार आली तर पुन्हा झाडलोट करण्यास पाठवितो. नागरिक व झाडलोट करणाऱ्या दोघांनाही आता स्वच्छतेची आवड निर्माण झाली आहे.
- किशोर डागवाले, नगरसेवक.

Web Title: Takatak cleanliness of the people through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.