संस्थान रुग्णालयात बेकायदा घुसणाऱ्या चौगुले यांच्यावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:31+5:302021-05-25T04:23:31+5:30
निवेदनात म्हटले आहे की, ९ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सचिन चौगुले तोकडे कपडे परिधान करून रुग्णालयात आले होते. त्यांनी ...
निवेदनात म्हटले आहे की, ९ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सचिन चौगुले तोकडे कपडे परिधान करून रुग्णालयात आले होते. त्यांनी कोविड सेंटरमध्ये येण्याची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती, तसेच आरोग्याच्या दृष्टीने मास्क किंवा पीपीई कीट परिधान केलेले नव्हते. कोविड कायद्याचे उल्लंघन करून सुरक्षेला न जुमानता त्यांनी बेकायदेशीरपणे सेंटरमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्याबरोबर संस्थानचे कर्मचारी अरुण जाधव व अन्य एकजण होता. त्यांनी कोरोनाचे पेशंट उपचार घेत असलेल्या संवेदन ठिकाणी म्हणजे आयसीयू, जीआयसीयू, मेडिसिन वाॅर्ड, फिमेल सर्जिकल वाॅर्ड व मेल सर्जिकल वाॅर्डात जाऊन महिला, पुरुष डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना नको ते प्रश्न विचारून त्यांच्या कामात अडथळा आणल्याने रुग्णसेवेला विलंब होत होता.
आम्ही कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र रुग्णांवर उपचार करत आहोत. चौगुले यांनी येथील मेडिकल स्टाफची समाजमाध्यमे व वर्तमानपत्रांतून पेशंटवर लक्ष देत नाहीत, ऑनड्युटी झोपलेले होते, मोबाईलमध्ये दंग होते अशा स्वरूपाच्या खोट्या तक्रारी करून बदनामी केली आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत, मनोबल खचले असल्याची तक्रार संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांच्याकडे केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनावर संगीता थोरात, पूनम पोतदार, दत्तात्रय गायकवाड, एम. एम. थोरात, संतोष गावडे, वैशाली सुर्वे, निर्मला सलगरकर, कांचन जाधव, साळवे, सुरय्या शाह, आशा जगताप, आशिष सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----------
सीसीटीव्ही फुटेज तपासले तर यातील अनेकजण ड्युटीवरच नसल्याचे समोर येईल. काहीजण क्वारंटाईन होते. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सदैव आदरच करतो, त्यांच्यावर दबाव आणून अधिकारी खोटे आरोप करण्यास भाग पाडत आहेत.
- सचिन चौगुले, शहराध्यक्ष, काँग्रेस-