अवाजवी शुल्काची मागणी करणार्या गॅलॅक्सी स्कूलवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:26 AM2021-02-17T04:26:25+5:302021-02-17T04:26:25+5:30
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात या शाळेवर कारवाई होण्यासाठी पालकांनी जोरदार निदर्शने केली. लाॅकडाऊनमध्ये जास्तीची फी घेऊ नये, याबाबत सूचना केल्या ...
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात या शाळेवर कारवाई होण्यासाठी पालकांनी जोरदार निदर्शने केली. लाॅकडाऊनमध्ये जास्तीची फी घेऊ नये, याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र गॅलॅक्सी नॅशनल स्कूलने पालकांकडून इतर शुल्काच्या नावाखाली अवाजवी फी वसुली केली. शिक्षण विभागाने केलेल्या सूचनांनादेखील शालेय प्रशासनाने केराची टोपली दाखवली असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
मागील सहा महिन्यांपासून पालक या शालेय प्रशासनाच्या चुकीच्या धोरणा विरोधात भांडत आहे. शिक्षणाधिकारी यांना अनेकवेळा तक्रार करुन वेळोवेळी पालकांनी निवेदन दिले व आंदोलन देखील केले. त्यावर शाळेच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नेमली, मात्र सहा महिन्यानंतर देखील सबंधीत शाळेवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या शाळेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पालकांनी लाऊन धरली. या मागणीचे निवेदन प्रभारी शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांना देण्यात आले. संबंधित शाळेचे शुल्क कमी करुन, अधिकचे शुल्क पालकांना परत करण्याचे व ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठवलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करुन पूरक मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याचे लेखी आदेश सय्यद यांनी काढल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात वैभव भोराडे, रमेश बेल्हेकर, संदीप गुंजाळ, रामदास ससे, गजानन भांडवलकर, दादा दरेकर, निलेश बांगरे, अंकुश गिते, जकी मुजावर, तुकाराम गिते, बाळासाहेब सांगळे, गजानन गिते, सविता गुंजाळ, सुमय्या पठाण, सुवर्णा गिते, सीमा ससे, वैशाली पवार, रविंद्र बेल्हेकर, वैशाली साळवे आदींसह पालक सहभागी झाले होते.
---------फोटो - १६पालक आंदोलन
लाॅकडाऊनमध्ये शाळा बंद असून देखील पालकांकडून अवाजवी शुल्काची मागणी केल्याने वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात निदर्शने केली.