बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:20 AM2021-03-25T04:20:13+5:302021-03-25T04:20:13+5:30
तळेगाव दिघे : शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या सभासदांनी बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ ...
तळेगाव दिघे : शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या सभासदांनी बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील श्रीराम मंदिरात तळेगाव दिघे, चिंचोलीगुरव, निमोण, नान्नजदुमाला व लोहारे या ठिकाणच्या जिल्हा बँक शाखा व सेवा सोसायट्यांच्या कर्ज वसुली आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक गणपत सांगळे होते. व्यासपीठावर तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, वसुली अधिकारी यु.के.शिंदे, प्रभाकर कांदळकर, नामदेव दिघे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, ज्ञानेश्वर सातपुते, सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम दिघे, मधुकर दिघे, मच्छिंद्र दिघे, बाबासाहेब गव्हाणे, शाखाधिकारी चांगदेव ढेपे, तात्यासाहेब दिघे, किसन सुपेकर, राजेंद्र कहांडळ, छबुराव सानप, बाबासाहेब जोंधळे, सचिव अनिल दिघे, सतीश वदक, सुभाष दिघे उपस्थित होते.
कानवडे म्हणाले, जिल्हा सहकारी बँकेला सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी लावलेल्या शिस्तीनुसार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही आम्ही बँकेच्या विकासासाठी काम करू. ३१ मार्चपूर्वी बँक बाकी थकबाकीसह भरण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा बँकचे उपाध्यक्ष कानवडे व संचालक सांगळे यांचा बिनविरोध निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अशोक थोरात यांनी केले. सूत्रसंचालन शाखाधिकारी चांगदेव ढेपे यांनी केले. सचिव अनिल दिघे यांनी आभार मानले.
...
फोटो : २४कानवडे सत्कार
...
तळेगाव दिघे येथे आयोजित आढावा बैठकीत जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, गणपत सांगळे यांचा सत्कार करताना स्थानिक पदाधिकारी.