कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात दुचाकी सांभाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:24 AM2021-09-22T04:24:10+5:302021-09-22T04:24:10+5:30
रोहित टेके लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : सध्या सर्वत्रच दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. कोपरगाव तालुका व शहर ...
रोहित टेके
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : सध्या सर्वत्रच दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. कोपरगाव तालुका व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चालू वर्षाच्या जानेवारीपासून आठ महिन्यांत ४१ दुचाकी चोरीस गेल्या आहेत. त्यापैकी ११ दुचाकींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले असून, ३० दुचाकींचा अद्याप शोध सुरू आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेतच सर्वाधिक दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरासह ग्रामीण भागातील १० गावे येतात. यातील सर्वाधिक दुचाकी या शहरातील बाजारपेठेत पाळत ठेवून, बसस्थानक परिसरातून, तसेच रात्रीच्या वेळी कॉलनी, अपार्टमेंटच्या पार्किंगमधून अथवा राहत्या घरासमोरून चोरी जाण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत वाढले आहे, तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ५५ गावे असून, या गावातील बाजारपेठेतून व रात्रीच्या वेळी गावठाण हद्दीतून, वाड्यावस्त्यांवरूनदेखील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढत आहे. या सर्वच प्रकारात दोन्ही पोलीस ठाण्यात अधिकारी, तसेच कर्मचारी संख्या मर्यादेपेक्षा खूप कमी प्रमाणात आहे. त्यातल्या त्यात काही प्रमाणात चोरी गेलेल्या दुचाकींचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले आहे. मात्र, अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे चांगलीच दमछाक होत आहे.
...........
* आठ महिन्यांत चोरी झालेल्या दुचाकी.
शहर पोलीस ठाणे - २०
तालुका पोलीस ठाणे - २१
* आठ महिन्यांत मिळून आलेल्या दुचाकी.
शहर पोलीस ठाणे - ८
तालुका पोलीस ठाणे - ३
............
दुचाकी चोरी करणारे बहुतांश आरोपी हे तालुका, जिल्ह्याबाहेरील अज्ञात असतात. त्यामुळे त्यांची ओळख पटवून शोध घेण्यास अवधी हा लागतोच, तसेच यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची गावोगावी गस्त सुरू राहिल्यास यातूनही आरोपींवर वचक राहतो; परंतु पोलीस ठाण्यातील अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे अगोदरच कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असतो. त्यामुळे गस्त कमी-अधिक प्रमाणात होते. त्यातूनच अशा चोरीच्या घटना होतात.
-दौलत जाधव, पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस ठाणे, कोपरगाव