बघता काय, कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:28+5:302021-06-11T04:15:28+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी नियमांचे पालन केले जात ...
अहमदनगर : जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे यंत्रणांनी या गर्दीकडे न बघता थेट कारवाई करा. शिस्त पाळली गेली नाही आणि कोरोनाचा संसर्ग वाढला तर पुन्हा निर्बंध लागू करण्याची वेळ येईल, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी इशारा दिला. गर्दी झाली तर बघत बसू नका, थेट कारवाई करा, असेच भोसले यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी गुरुवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणांचे सर्व प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, दैनंदिन चाचण्यांची संख्या आता वाढविली आहे. कमी चाचण्या होणाऱ्या नगरपालिका अथवा ग्रामीण रुग्णालयांनाही चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करावे. निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तवणुकीचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणांनी पथके नेमून कारवाई करावी. जिथे नियमांचे उल्लंघन होते, तिथे आदेशाची वाट न पाहता थेट कारवाई करा.
दैनंदिन व्यवहार सुरु झाले असले तरी दुकाने अधिनियमांतर्गत दिलेल्या वेळेतच दुकाने आस्थापना सुरु आणि बंद करणे अपेक्षित आहे. याबाबत संबंधित नगरपालिकांनी वेळ संदर्भात ठराव केले असतील तर त्याची अंमलबजावणी केली जावी. कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे. त्यामुळे संबंधित आस्थापनांच्या चालकांनीही त्यांच्या दुकानात येणारे ग्राहक अथवा दुकानात काम करणारे कामगार हे नियमांचे पालन करीत असल्याबाबत खात्री करावी. भाजी विक्री, दूध विक्री, किराणा दुकाने व अन्य आस्थापनांच्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी होणार नाही, हे पाहावे.
------------