रेखा जरे हत्याकांड खटला जलदगती न्यायालयात चालवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:48+5:302021-06-17T04:15:48+5:30
याबाबत दिलेल्या निवेदनात ॲड.लगड यांनी म्हटले आहे की, जरे यांची ३० नोव्हेंबर, २०२० रोजी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात ...
याबाबत दिलेल्या निवेदनात ॲड.लगड यांनी म्हटले आहे की, जरे यांची ३० नोव्हेंबर, २०२० रोजी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याने सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण बारा आरोपींना अटक करत, त्यांच्याविरोधात नुकतेच दोषारोपपत्र दाखल केले आहे. बोठे याच्याविरोधात पोलिसांना सक्षम पुरावे मिळाले आहेत. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मयत रेखा जरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी होत्या, तसेच त्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष होत्या. नगर शहरासह जिल्ह्यातील महिलांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी शासनस्तरावर नेहमी पाठपुरावा केला, आंदोलने केली. जरे यांच्या हत्येने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला वर्गामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका महिलेची अशी निर्घृण हत्या होणे म्हणजे समाजाला काळिमा फासणारी घटना आहे. अशा परिस्थितीत या खटल्याचे कामकाज तातडीने पूर्ण होऊन, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह सर्वच आरोपींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयातही देण्यात आली आहे.