महाजनादेश यात्रा अहमदनगरमध्ये पोहोचताच मुख्यमंत्री विखे पाटलांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 02:45 PM2019-08-26T14:45:54+5:302019-08-26T14:51:50+5:30
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महाजनादेश यात्रेचे आगमन नगर जिल्ह्यात सोमवारी झाले आहे.
लोणी : प्रवरा परिसराच्या राजकीय, सामाजिक वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या श्रीमती स्व.सिंधुताई विखे पाटील यांना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी लोणी येथे सोमवारी आदरांजली अर्पण केली. त्यानंतर फडणवीस यांनी विखे पाटील परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांचे १८ ऑगस्ट रोजी निधन झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे विखे पाटील परिवाराची सांत्वनपर भेट घेण्यासाठी सोमवारी सकाळी शिर्डी विमानतळावर आगमन झाले.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महाजनादेश यात्रेचे आगमन नगर जिल्ह्यात सोमवारी झाले आहे. पाथर्डी येथे जाहीर सभेस रवाना होण्यापूर्वी लोणी येथे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. लोणी येथील आपल्या १५ मिनिटांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी विखे पाटील परिवारातील सर्व सदस्यांशी संवाद साधून या दु:खद घटनेतून सावरण्याचा दिलासा दिला. श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांनी ग्रामीण भागात महिलांसाठी केलेल्या कार्याची माहिती करुन घेतली. याप्रसंगी माजी आमदार चंद्रशेखर कदम, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, काशिनाथ विखे, डॉ.अशोक विखे, डॉ.राजेंद्र विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, खासदार डॉ.सुजय विखे, सुवर्णा विखे, धनश्री विखे, ध्रुव राजेंद्र विखे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
अनेक मान्यवरांनी केले सांत्वन
मागील दहा दिवसाच्या काळात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी विखे पाटील परिवाराचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या आहेत. यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जेष्ठ नेते आ.गणपतराव देशमुख, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, बबनराव लोणीकर, योगेशजी सागर, मधुकर पिचड, हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, शोभा बच्छाव, अशोक पाटील, आ.अब्दुल सत्तार, आ.पृथ्वीराज देशमुख, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.विश्वजित कदम, आ.मंगलप्रभात लोढा, रणजितसिंह मोहिते, रामगिरीजी महाराज, रामराव ढोक महाराज, निवृत्ती महाराज देशमुख, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, डॉ.एम.जी.ताकवले, राजाराम देशमुख, रजनीताई पाटील, दिलीप गांधी, राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी शेखर, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश पाटील, भगवंतराव मोरे यांच्यासह आजी, माजी आमदार, प्रशासकीय क्षेत्रातील अधिकाºयांचा समावेश होता.