दोन हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात
By Admin | Published: May 30, 2017 03:17 PM2017-05-30T15:17:10+5:302017-05-30T15:17:10+5:30
नवीन सातबारा उतारा देण्याच्या कामासाठी सुमारे दोन हजाराची लाच घेताना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
आॅनलाईन लोकमत
श्रीगोंदा, दि़ ३० - तालुक्यातील मुंढेकरवाडीचे कामगार तलाठी जगन्नाथ म्हस्के यांना नवीन सातबारा उतारा देण्याच्या कामासाठी सुमारे दोन हजाराची लाच घेताना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या तलाठ्याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
कामगार तलाठी म्हस्के याने खरेदीखताची नोंद लावून नवीन सातबारा उतारा देण्यासाठी पैसे दिल्याशिवाय तुमचे काम होणार नाही, असे सांगून एका शेतकऱ्याकडे दोन हजारांची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या नेतृत्वाखाली तलाठी म्हस्के याच्या घराभोवती सापळा लावण्यात आला. म्हस्के शेतकऱ्याकडून दोन हजारांची लाच घेताना या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
या पथकात पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, पो.कॉ. काशिनाथ खराडे, नितीन दराडे, सुनील पवार, एकनाथ आव्हाड, रवींद्र सावंत, वसंत वाव्हळ, तन्वीर शेख, अंबादास हुलगे यांचा समावेश होता. पोलिसांनी म्हस्के याला पकडण्यासाठी सोमवारी सापळा लावला होता. परंतु सापळ्यात न सापडल्याने मंगळवारी पुन्हा सापळा लावण्यात आला.