रेमडेसीवीरच्या उपलब्धतेबाबत राहाता तालुका वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:20 AM2021-04-11T04:20:59+5:302021-04-11T04:20:59+5:30
काळ्याबाजारला आळा घालून रेमडेसीवीरचे नियोजनपूर्वक वितरण होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होवू शकेल, अशा ४५ ...
काळ्याबाजारला आळा घालून रेमडेसीवीरचे नियोजनपूर्वक वितरण होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होवू शकेल, अशा ४५ मेडिकल स्टोअर्सची यादी जाहीर केली आहे. उपलब्ध असलेल्या यादीनुसार यात राहाता तालुक्यात प्रवरा रूरल हॉस्पिटल वगळता एकाही ठिकाणचा उल्लेख नाही.
रोज सर्वाधिक रुग्ण आढळणारा तालुका अशी दुर्दैवी ओळख राहाता तालुक्याची निर्माण झाली आहे. शिर्डीतील कोविड रुग्णालय जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे व विनामूल्य सेवा देणारे रुग्णालय आहे. गेल्या चार दिवसांपासून पन्नासहून अधिक रुग्ण रेमडेसीवीरअभावी जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवर संघर्ष करत आहेत. या सेवाभावी रुग्णालयाला मदत करण्याऐवजी प्रशासनातील काही विभाग अडचणी निर्माण करण्यात धन्यता मानत आहेत.
खासगी सेंटरच्या मेडिकल स्टोअर्सचाही यादीत समावेश करण्यात आलेला आहे. संस्थानच्या कोविड सेंटरला मात्र कोणतेही मेडिकल स्टोअर्स अॅटेच केलेले नाही. शिर्डीतील संस्थान रुग्णालयाच्या कॅम्पसमधील, शहरातील किंवा तालुक्यातील अन्य मेडिकलमध्ये रेमडेसीवीरची उपलब्धता नसणे, हे या रुग्णांना वाऱ्यावर सोडून देण्यासारखे आहे.
खा. सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे कमलाकर कोते यांनी सांगितले.
उपलब्ध असलेल्या यादीबाबत अन्न व प्रशासन विभागाचे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त राठोड यांच्याशी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
...........
शिर्डी व तालुक्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मेडिकलच्या यादीबाबतही माहिती घेत आहे.
- कुंदन हिरे, तहसीलदार, राहाता