चिंचेचं गाव... 30 वर्षांपूर्वी लावलेल्या 150 झाडांनी बदललं गावचं 'अर्थ'कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:25 AM2022-02-18T10:25:35+5:302022-02-18T10:27:33+5:30
नगर - चिंचेचं गाव म्हणून नगर तालुक्यातील मांडवे गावची ओळख बनली आहे. या गावचे सौंदर्यच या झाडांनी बहरुन गेले ...
नगर - चिंचेचं गाव म्हणून नगर तालुक्यातील मांडवे गावची ओळख बनली आहे. या गावचे सौंदर्यच या झाडांनी बहरुन गेले आहे. एवढेच काय गावाला भरगच्च उत्पन्न मिळवून देणारी गावाची चिंचेची झाडं गावातील अर्थकारणाचा महत्त्वाचा हिस्सा बनली आहेत. मांडवे गावचे माजी सरपंच साहेबराव लक्ष्मण निमसे यांनी १९९० रोजी ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत चिंचेची सुमारे दीडशे झाडे लावली होती. आता ही झाडे वटवृक्षासारखी मोठी झाली आहेत.
गावात प्रवेश करताच चिंचेची डेरेदार झाडे नजरेत भरतात. यापैकी ११५ झाडांना चांगल्या चिंचा आल्या आहेत. दहा वर्षांपासून या झाडांना चिंचा येत आहेत. दरवर्षी पन्नास हजार रुपयांपर्यंत चिंचेचा लिलाव होतो. या वर्षी सव्वा लाख रुपयांपर्यंत चिंचेचा लिलाव होईल, अशी अपेक्षा आहे. या चिंचेच्या झाडांमुळे गावातील मुख्य चौकामध्ये सर्वत्र गार हवा, आराम करण्यासाठी छान सावली मिळत आहे. चौकाजवळ शाळा असल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी या झाडांचा चांगला फायदा होत आहे. गावात काही कार्यक्रम असेल तर या झाडांच्या सावलीखालीच ते पार पाडले जातात. गावाच्या चोहोबाजूंनी हे चिंचेची झाडे लावण्यात आली आहेत. गावात जवळपास प्रत्येकाच्या घरासमोर तसेच वस्तीवर मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडे आहेत. या झाडांमुळे आर्थिक उत्पन्न चांगले मिळते. ही चिंचेची झाडे गावातील अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग बनत असून या उत्पन्नामुळे गावातील विकास कार्याला हातभार लागत आहे.
गावात सर्वत्र चिंचेची झाडे असल्यामुळे गावात प्रसन्न व शांत वाटते. गावातील ग्रामपंचायतीच्या जागा संपल्यामुळे झाडे लावण्यास जागा राहिली नाही. तरीही जेथे जागा उपलब्ध होईल तेथे वृक्षारोपण करीत असतो. ही झाडे जगविण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. त्यामुळेच आज टवटवीत झाडे पाहावयास मिळत असून, या झाडांमुळे गावातील सौंदर्यात भर पडली आहे.
- सुभाष निमसे,
सरपंच, मांडवे