तमाशा कलावंत हल्ला प्रकरण : तब्बल ११ तासानंतर तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 06:39 PM2019-04-26T18:39:53+5:302019-04-26T18:55:33+5:30
टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या हरीभाऊ बडे सह शिवकन्या कचरे यांच्या तमाशातील कलावंतांवर गावातील गुंडांनी प्राणघातक हल्ला करत महिला कलाकारांचा विनयभंग केला.
श्रीगोंदा : टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या हरीभाऊ बडे सह शिवकन्या कचरे यांच्या तमाशातील कलावंतांवर गावातील गुंडांनी प्राणघातक हल्ला करत महिला कलाकारांचा विनयभंग केला. या हल्ल्यामध्ये बारा तमाशा कलावंत जखमी झाले आहेत. याप्रकरणी गावातील तेरा जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
तमाशा कलावंत शिवकन्या नंदा कचरे (रा.कोरडगाव ता.पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप सुरेश सुडगे, अशोक माऊली सुडगे, शांताराम सुडगे, गणेश कैलास जगदाळे, सचिन सुरेश सुडगे, नितीन मल्हारी जगदाळे यांच्यासह पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीत बाजार समितीचे माजी उपसभापती सुरेश सुडगे यांच्या दोन मुलांचा समावेश आहे.
भा.द.वि. कलम ३२६,३५४,१४३,१४७ व बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २0१२ चे कलम ७,८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मारहाणीत शिवकन्या कचरे, राणी बडे, सचिन चव्हाण, अशोक बडे, मुबारक जमादार, देवानंद कांबळे, प्रशिक्षक कांबळे, अनिल बांगर, पप्पू गोरे, मयूर गोरे, मयुर चव्हाण, अस्लम बेगमिर्झा हे जखमी झाले आहेत. जखमींना नगर येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजता अखील भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष अविष्कार मुळे व पठ्ठे बापुराव तमाशा परिषदचे अध्यक्ष संभाजी जाधव, एल. जी. शेख हे श्रीगोंद्यात दाखल झाले. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दुपारी सव्वा दोन तपासासाठी दोन पथके तैनात करण्यात आली. आरोपींच्या अटकेसाठी बीड व टाकळीकडे पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी एका आरोपीस एटक केलीआहे.
शाळकरी मुलीवर अत्याचार
पुढील शिक्षणासाठी दोन पैसे मिळावेत यासाठी एक मुलगी तमाशात काम करत होती. मात्र गावातील या हल्लेखोरांनी या मुलीला ऊसात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिला उसामध्ये नेऊन कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तिचा हात मोडला. तमाशा कलावंतांनी त्या मुलीची सुटका केली.
तर यात्रा कमिटी आरोपी
आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक केली आहे.यात्रा कमिटी सदस्यांनी आरोपी पकडून देण्यासाठी मदत केली नाही तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे.- संजय सातव, पोलिस उपअधीक्षक, कर्जत
राज्यभर निषेध
तमाशा कलावंत लोककला जीवंत ठेवण्यासाठी गावोगाव फिरत असतात. टाकळी गावातील गुंडांनी आमच्या कलाकारांना मारहाण करून निंदनीय कृत्य केले. याचा आम्ही महाराष्ट्रभर निषेध नोंदविणार आहे. आरोपीच्या अटकेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. -अविष्कार मुळे, अध्यक्ष, अखील भारतीय तमाशा परिषद.