तमाशा कलावंत हल्ला प्रकरण : पाथर्डी तालुक्यात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 06:24 PM2019-04-27T18:24:29+5:302019-04-27T18:24:36+5:30
तालुक्यातील तमाशा कलावंतांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या हरिभाऊ बडे यांच्या तमाशातील
पाथर्डी : तालुक्यातील तमाशा कलावंतांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या हरिभाऊ बडे यांच्या तमाशातील कलावंतांवर गावगुंडांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ आरोपींवर कडक कारवाईच्या मागणीसाठी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देवून कारवाईची मागणी करण्यात आली.
भारतीय संस्कृतीची जपणूक करणा-या तसेच भारतीय संस्कृतीची नवीन पिढीला ओळख करून देणा-या लोककलेच्या रक्षकावर केलेला हल्ला म्हणजे थेट लोककलेवरील हल्ला असून गावगुंडांनी तमाशातील महिला व बाल कलावंतांना केलेली मारहाण निंदनीय असून अशा गुंड प्रवृत्तीचा निषेध करत असल्याचे यावेळी तालुक्यातील कलावंतांनी सांगितले. यावेळी कलावंतांनी पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जावळे यांना आरोपीवर कडक कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले.
तमाशा कलावंत सुखदेव मदार्नी, शाहीर भारत गाडेकर, संजय गटागट, गणेश जायभाय, ईश्वर घोडके, वैभव मदार्ने, ऋषिकेश जायभाय, राजू देशमुख, विजय गोसावी, राहुल घोरपडे, मनवेल उनवणे, ए.के.वांडेकर, अर्जुन देशमुख, निवृत्ती शेळके, संजय केदार आदींसह तालुक्यातील बहुसंख्य कलाकार उपस्थित होते.