टँकरअभावी ५ गावे तहानलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2016 12:08 AM2016-07-27T00:08:39+5:302016-07-27T00:37:31+5:30
शेवगाव : तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी, मळेगाव शे। आदी ५ गावात अपुऱ्या पावसावर बंद करण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर
शेवगाव : तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी, मळेगाव शे। आदी ५ गावात अपुऱ्या पावसावर बंद करण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर पूर्ववत सुरू करण्याच्या हालचाली नसल्याने ग्रामस्थांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अपूर्ततेची पूर्तता करण्यासाठी तालुका प्रशासनाकडे पुन्हा परत आलेले मागणीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी वरील ५ गावांतील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांकडून होत आहे.
भातकुडगाव मंडळात अजूनही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. प्रशासनाने मात्र टंचाई सुविधांची मुदत संपल्याने भातकुडगावसह परिसरात सुरू असलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर १ जुलैपासून बंद केलेले आहेत. परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या संकटामुळे वरील पाच गावांतील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसह शेवगाव- नेवासा हमरस्त्यावरील भातकुडगाव फाट्यावर दि. ४ जुलै रोजी तब्बल ३ तास रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून याबाबत वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी यांनी तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे जाहीर केले. मात्र, अजूनही टँकर सुरू झालेले नाहीत. तालुका प्रशासनाने प्रांताधिकारी कार्यालयाकडे त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टँकरचे प्रस्ताव सादर केले.
मात्र अपूर्ततेच्या कारणामुळे परत आलेले प्रस्ताव आज सोमवारी पंचायत समितीच्या टंचाई विभागाने तहसील कार्यालयाकडे पाठविल्याची माहिती ग्रामस्थांना सांगण्यात आली.
भातकुडगाव परिसरात अजूनही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकावे लागते. पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी भायगावच्या सरपंच मनिषा आढाव, भातकुडगावचे सरपंच बाजीराव जमधडे, उपसरपंच शंकर नारळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ साळवे, देवटाकळीचे श्रीराम खरड, बक्तरपूरचे भाऊसाहेब सामृत आदी कार्यकर्त्यांनी केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)