जिल्ह्यात टँकर लॉबी : पाणी वाहतुकीत मूठभर संस्थांचीच मक्तेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 11:05 AM2018-12-23T11:05:24+5:302018-12-23T11:05:52+5:30

दुष्काळाने होरपळत असलेल्या तालुक्यांमध्ये पाणी वाहतुकीसाठी जिल्हाप्रशासनाने निविदा मागविल्या होत्या़ पहिल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही़

Tanker lobby in the district: Monopoly of a handful of people in water traffic | जिल्ह्यात टँकर लॉबी : पाणी वाहतुकीत मूठभर संस्थांचीच मक्तेदारी

जिल्ह्यात टँकर लॉबी : पाणी वाहतुकीत मूठभर संस्थांचीच मक्तेदारी

अण्णा नवथर
अहमदनगर : दुष्काळाने होरपळत असलेल्या तालुक्यांमध्ये पाणी वाहतुकीसाठी जिल्हाप्रशासनाने निविदा मागविल्या होत्या़ पहिल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही़ मुदतवाढ दिल्यानंतर मात्र संगमनेर व शिर्डी विभाग वगळता चारही विभागांसाठी निविदा आल्या़ संस्थांनी भरलेल्या निविदांचा अभ्यास केला असता पाणी वाहतुकीत ठराविक संस्थांचीच मक्तेदारी असल्याचे समोर आले आहे़
पाणी वाहतुकीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक विभागासाठी सहा स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या होत्या़ दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने आॅक्टोबरमध्येच ही प्रक्रिया सुरू केली होती़ काम वाटप करताना स्पर्धा हा महत्वाचा निकष असतो़ निविदा भरण्याची मुदत २६ नोव्हेंबर होती़ पण, या काळात एकापेक्षा अधिक निविदा न आल्याने स्पर्धा झाली नाही़ त्यामुळे ४ डिसेंबरपर्यंत प्रथम मुदतवाढ दिली गेली़ मुदतवाढीनंतर पाथर्डीसाठी चार निविदा आल्या़ अन्य नगर, कर्जत आणि श्रीगोंदा -पारनेर, या विभागांसाठी प्रत्येकी तीन निविदा प्राप्त झाल्या़ शिर्डी व संगमनेर, विभागांसाठी एकही निविदा आली नाही़ मुदतवाढ दिल्यानंतर या विभागासाठी तीन निविदा आल्या़ एका संस्थेने किती निविदा भराव्यात, अशी कोणतीही अट निविदेत नव्हती़ याचा गैरफायदा उठवित एकाच संस्थेने दोन ते तीन विभागांसाठी निविदा भरलेल्या आहेत़ एकच संस्था दोन तालुक्यांना पाणीपुरवठा कशी करू शकते, हा अनुत्तरीत आहे़
येथील गाडे ट्रान्सपोर्ट संस्थेने नगर व पाथर्डी, या दोन्ही विभागासाठी निविदा भरल्या़ या संस्थेने नगरसाठी २९२, तर पाथर्डीसाठी प्रतिटन २३५ रुपयांचा दर दिला़ श्रीरामपूर येथील लक्ष्मीमाता मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रोटक्टर्स संस्थेने नगरसाठी २३९, संगमनेर २४५, पाथर्डीसाठी प्रतिटन २६५ रुपये, असा दर दिला़ पारनेर येथील साई सहारा इन्फ्रा अ‍ॅण्ड फॅसिलिटी प्रा़ लि़ ने नगर व कर्जत तालुक्यासाठी एकसारखे २६०,तर संगनेरसाठी २४० रुपयांचे दर दिलेले आहेत़ जामखेड येथील विट उत्पादकांची मोटर वाहतूक संस्थेने कर्जत विभागासाठी निविदा भरताना २३५, तर श्रीगोंदा- पारनेरसाठी प्रतिटन २४० रुपयांचे दर दिले आहेत़ शेवगाव येथील श्रीगणेश सहकारी मोटार वाहतूक संस्थेने पाथर्डीसाठी २३५, तर कर्जत विभागासाठी प्रतिटन २५५ रुपये दर दिलेला आहे़
नवीन संस्थांसाठी निविदेची दारे बंद
जिल्हा परिषदेतही विविध कामे घेताना अनुभवाची अट होती़ परंतु, मूठभर संस्थांची मक्तेदारी वाढू लागल्याने जिल्हा परिषदेने ही अट रद्द केली़ जिल्हाप्रशासनाने मात्र अनुभवाची अट वाढवित एकप्रकारे मक्तेदारीला खतपाणी घातल्याचे दिसून येते़ त्यामुळे नवीन संस्थांची दारे बंद झाली आहेत.
अनुभवाची अट एक वर्षावरून तीन वर्षे
पाणी वाहतुकीत ठराविक संस्थांची मक्तेदारी होण्यामागे अनुभवाची अट, हे एक कारण आहे़ पाणी वाहतुकीची निविदा भरताना संबंधित संस्थेला या कामाचा तीन वर्षांचा अनुभव, असणे बंधनकारक आहे़ मागीलवर्षीपर्यंत एक वर्षांच्या अनुभवाची अट होती़ चालूवर्षी मात्र त्यात दोन वर्षांनी वाढ केल्याने नवीन संस्था निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकल्या नाहीत़ परिणामी वर्षानुवर्षे हे काम करणाऱ्या संस्थांनाच कामे मिळतील, अशी स्थिती आहे.

 

Web Title: Tanker lobby in the district: Monopoly of a handful of people in water traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.