टँकर गावात, लॉगबुक कार्यालयात : पुणेवाडीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 04:29 PM2019-05-11T16:29:32+5:302019-05-11T16:29:36+5:30
लॉगबुक टॅँकर मालकाच्या कार्यालयात असते. तेथील मुले येऊन सह्या घेऊन जातात, अशी चक्रावणारी माहिती पुणेवाडीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दिली.
विनोद गोळे
पारनेर : लॉगबुक टॅँकर मालकाच्या कार्यालयात असते. तेथील मुले येऊन सह्या घेऊन जातात, अशी चक्रावणारी माहिती पुणेवाडीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दिली.
पारनेर तालुक्यातील अनेक टँकरवर गावांचे फलक नाही, जीपीएस फक्त नावापुरते असून गाडीत लॉगबुक ठेवले जात नसल्याचे दिसून आले. वडनेर हवेलीत टँकर नादुरुस्त झाला म्हणून आला नाही. करंदी, हत्तलखिंडीमध्ये टँकर आलेच नाही, असे चित्र दिसून आले.
पुणेवाडी येथील गावाला पाणीपुरवठा करणाºया टॅँकरने (एम. एच. १४ एफ ५९५४) दुपारीच खेपा पूर्ण केल्या. त्या टॅँकरवर कोणताही फलक नव्हता. वाहनात लॉग बुक नसते, असे चालकाने सांगितले. वाहन मालकाच्या कार्यालयात ते असते. तेथील मुले येऊन लॉग बुकवर सह्या घेऊन जातात, असे ग्रामपंचायत कर्मचाºयाने सांगितले.
टँकरच्या खेपाच नाही
शुक्रवारी सकाळीच हत्तलखिंडीत गेल्यावर टँकरची वाट पाहत बसलो होतो पण टँकर येणार नाही, त्याने ही खेप गुरुवारीच पूर्ण केल्याचे आकाश शेळके या युवकाने सांगितले. करंदीमध्येही एक टँकर येणार नसल्याचे सरपंच नामदेव ठाणगे यांनी सांगितले. वडनेर हवेलीचा टँकर नादुरुस्तमुळे येणार नाही असे शशी भालेकर म्हणाले.
पंचायत समितीची यंत्रणा निद्रिस्त
टँकर कोणत्या गावात कधी येतात? टँकरच्या खेपा होतात का? फलक लावले का? व इतर कोणतीच तपासणी पारनेर पंचायत समिती व पारनेर नगर पंचायतची यंत्रणा करीत नसल्याचे दिसून आले.