शेततळ्यावर भरतात टँकर : वनकुटेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 05:40 PM2019-05-11T17:40:56+5:302019-05-11T17:41:13+5:30
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसराला पाणी पुरवठा करणारे टॅँकर उद्भवाऐवजी (वावरथ जांभळी) वनकुटे येथील शेततळ्यातूनच अस्वच्छ पाणी भरत असल्याचा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला.
भिकाजी धुमाळ
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसराला पाणी पुरवठा करणारे टॅँकर उद्भवाऐवजी (वावरथ जांभळी) वनकुटे येथील शेततळ्यातूनच अस्वच्छ पाणी भरत असल्याचा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला.
पारनेर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने मुळा नदीतील वावरथ जांभळी येथून पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु वावरथ जांभळी ते टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, कर्जुले हर्या, कान्हूरपठार, तिखोल, वडगाव सावताळ या गावांपर्यंत भरलेले पाण्याचे टँकर आणण्यासाठी टॅँकरचा खर्च वाढतो. पैशाची बचत करण्यासाठी जवळजवळ ५० टक्के टँकर वावरथ जांभळी ऐवजी वनकुटे येथील शेततळ्यात भरले जातात. शेततळ्यातील पाणी अत्यंत अस्वच्छ आहे. त्यामुळे गावागावात अशुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. वनकुट्यातून टॅँकर भरल्याने किमान २५ किमी अंतर कमी होते. त्यामुळे टॅँकर मालकांना हजार ते दीड हजार रूपयांचा फायदा होतो. वनकुटे परिसरातील तब्बल चार ते पाच शेततळ्यातून पाण्याचे टँकर भरले जातात. प्रशासन याकडे डोळेझाक करते.
शेततळे मालक कमावतो प्रतिदिन ५० हजार रुपये
पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत किमान टॅँकरच्या १०० खेपा भरल्या जातात. एक टँकर भरण्यासाठी ५०० रूपये घेतले जातात. अशा प्रकारे प्रतिदिन एका शेततळ्याचा मालक ५० हजार रुपये दिवसाला कमावतो, अशी माहिती शेततळ्याच्या मालकाने दिली.