शिक्षकाने घेतले पाच कुटुंब दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:20 AM2021-04-22T04:20:50+5:302021-04-22T04:20:50+5:30
करंजी : लाॅकडाऊन झाल्याने उपासमार होत असल्याने शिक्षक विजय कारखेले यांनी त्रिभुवनवाडी (ता. पाथर्डी) येथील पाच कुटुंब दत्तक घेऊन ...
करंजी : लाॅकडाऊन झाल्याने उपासमार होत असल्याने शिक्षक विजय कारखेले यांनी त्रिभुवनवाडी (ता. पाथर्डी) येथील पाच कुटुंब दत्तक घेऊन समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला.
करंजी परिसरातील करंजीसह देवराई, त्रिभुवनवाडी, कौडगाव, घाटसिरस, जोहारवाडी, लोहसर, खांडगाव, भोसे, वैजूबाभूळगाव, सातवडसह अनेक गावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने राज्यात १४ दिवसांचे लॉकडाऊन केले. त्यामुळे हातावर पोट भरणारांची उपासमार होऊ लागली. काम केले तर पोटाला भाकर, अन्यथा उपाशीपोटी झोपण्याची वेळ अनेक गरीब कुटुंबांवर आली आहे. आपण समाजाचे काही-तरी देणे लागतो, या भावनेने परिसरातील ५ कुटुंब दत्तक घेऊन त्या कुटुंबांना १ महिन्यासाठी तांदूळ, गहू, तेल, मीठ, साखर, चहापुडा, साबण आदी वस्तू देऊन कारखेले गुरुजी यांनी समाजापुढे आदर्श ठेवला. यावेळी विजय कारखेले यांनी त्रिभुवनवाडी येथील सुभाष जाधव, सुरेश जाधव, आसराजी कारखेले, आशाबाई पालवे, सरस्वती कारखेले या कुटुबांना संपूर्ण लॉकडाऊनच्या काळासाठी दत्तक घेतले असून, त्यांना जीवनाश्यक वस्तुंच्या किटचे वाटप केले.
--
तारेवरील कसरतीचे खेळ करून आम्ही पोट भरीत होतो. १ वर्षापासून या महामारीने खेळ बंद झाले. मोलमजुरीस येऊ देत नाही. आमची उपासमार होत आहे. कारखेले गुरुजींनी आम्हाला मदत केली.
-सुरेश जाधव,
नागरिक, त्रिभुवनवाडी
--
२१ त्रिभुवनवाडी
त्रिभुवनवाडी येथे गरजू कुटुंबाला किराणा साहित्य देताना शिक्षक विजय कारखेले.