शिक्षक पुरस्कार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, १४ शिक्षकांसह एका केंद्रप्रमुखाची होणार निवड
By चंद्रकांत शेळके | Published: August 10, 2023 10:55 PM2023-08-10T22:55:01+5:302023-08-10T23:05:28+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीनंतर हे पुरस्कार अंतिम होणार आहेत.
अहमदनगर : दरवर्षी शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तालुकानिहाय शिक्षकांची लेखी परीक्षा पूर्ण होऊन पडताळणीही झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीनंतर हे पुरस्कार अंतिम होणार आहेत.
दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. ५ सप्टेंबरला (शिक्षक दिनी) या पुरस्काराचे वितरण होते. तालुकानिहाय १ याप्रमाणे १४ शिक्षकांची व एका केंद्रप्रमुखाची निवड पुरस्कारासाठी केली जाते. या पुरस्कारासाठी मागील आठवड्यात लेखी परीक्षा पूर्ण झाली.
त्यानंतर शिक्षकांची तालुकानिहाय माहिती, तसेच लेखी परीक्षेचे गुण याची गोपनीय माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे पाठवण्यात आली. लवकरच येरेकर या माहितीची पडताळणी करून त्याआधारे गुणवत्तेनुसार प्रत्येक तालुक्यातील एक अशा १४ प्राथमिक शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी आणि एका केंद्रप्रमुखाची निवड करणार आहेत.
या बाबी घेतल्या विचारात...
या पुरस्कारासाठी शिक्षकांनी राबवलेले विविध उपक्रम, शैक्षणिक ब्लॉग, वेबसाइटची निर्मिती व त्यावर केलेले लिखाण, मुलांच्या शिक्षणासाठी यू-ट्यूब चॅनेलची निर्मिती, विविध शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सहल, इस्रो सहल, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेले विविध प्रयोग, इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी येण्यासाठी केलेले प्रयोग यासह अन्य शैक्षणिक कामगिरीचे मूल्यमापन या पुरस्कारासाठी विचारात घेण्यात आले. यासाठी १०० गुण असून त्यात २५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली.