जिल्हा परिषद बदल्यांवर आता शिक्षक मतदारसंघ आचारसंहितेचे सावट

By चंद्रकांत शेळके | Published: May 15, 2024 10:18 PM2024-05-15T22:18:43+5:302024-05-15T22:19:07+5:30

सेवाज्येष्ठता याद्या तयार, बदल्या प्रक्रिया जुलैमध्ये जाण्याची शक्यता

Teacher Constituency Code of Conduct may be delay Zilla Parishad Transfers | जिल्हा परिषद बदल्यांवर आता शिक्षक मतदारसंघ आचारसंहितेचे सावट

जिल्हा परिषद बदल्यांवर आता शिक्षक मतदारसंघ आचारसंहितेचे सावट

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया यंदा लोकसभा व नंतर शिक्षक मतदारसंघातील निवडणूक आचारसंहितेमुळे थेट जुलैमध्ये जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दरवर्षी मे महिन्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक वगळता गट क व गट ड) बदल्यांची प्रक्रिया राबवली जाते.

दरवर्षी कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागलेले असतात. २०२३च्या बदल्या ९ मे पासून सुरू झाल्या होत्या. यंदा मात्र लोकसभेची निवडणूक असल्याने बदल्यांचा कालावधी पुढे गेला आहे. ४ जूनला लोकसभेचा निकाल आहे. त्यानंतरच बदल्या होणार अशी स्थिती होती. मात्र, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वारे लगेच वाहू लागले आहेत. १० जूनला शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूक घेण्याचे आयोगाने ८ मे रोजी जाहीर केेले होते. परंतु, निवडणूक उन्हाळी सुटीनंतर घ्या, अशी मागणी शिक्षकांनी केल्याने तूर्तास ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

१५ जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यानंतर २५ ते ३० जूनदरम्यान पुन्हा शिक्षक व पदवीधर निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता आहे. त्याची आचारसंहिता २५ मेच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. तसे झाले तर बदल्यांची प्रक्रिया थेट जुलैमध्ये जाण्याची शक्यता आहे.

प्रशासनाची तयारी पूर्ण

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने बदल्यांची सर्व तयारी करण्याच्या सूचना खातेप्रमुख व सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. ५ एप्रिल रोजी सामान्य प्रशासन विभागाने तसे पत्र काढले होते. १४ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत बदल्यांबाबतची सर्व पूर्वतयारी करायची आहे. यात कार्यालयप्रमुखांनी १५ ते २१ एप्रिलपर्यंत त्यांच्या स्तरावर संवर्गनिहाय कर्मचारी सेवाज्येष्ठता यादी तयारी करावी. तसेच त्यावर हरकती घेऊन ही यादी अंतिम करावी. २२ एप्रिलपासून २९ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी दिलेले विकल्प, विनंती अर्ज विहीत कागदपत्रांसह खातेप्रमुखांकडे सादर करावे, ३० एप्रिल रोजी या विकल्प व अर्जांची छाननी करून माहिती अद्ययावत करावी व जिल्हास्तरावर संवर्गनिहाय खातेप्रमुखांकडे माहिती सादर करावी, असे या पत्रात म्हटले होते. त्यानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता याद्या व इतर तयारी प्रशासनाने केली आहे.

शिक्षक बदल्यांबाबतही संभ्रम

शिक्षक बदली धोरणानुसार शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधीच शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया उरकणे अपेक्षित आहे. १५ जूनला शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. परंतु आचारसंहितेमुळे त्याआधी शिक्षकांची बदल्यांची प्रक्रिया होणे शक्य नाही. त्यामुळे यंदा बदल्या होणारी की नाही याबाबतही शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जूनअखेर होण्याची शक्यता आहे. लोकसभेची आचारसंहिता संपली की शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यामुळे यंदा शिक्षकांच्या बदल्यांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Teacher Constituency Code of Conduct may be delay Zilla Parishad Transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.