शिक्षक मतदारसंघ निवडणूक : नगर जिल्ह्यातील तीन उमेदवार मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 01:33 PM2018-03-26T13:33:55+5:302018-03-26T13:34:38+5:30
नगरमधील नाशिक विभाग शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांना विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या जून २०१८ मध्ये होणाऱ्या निवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.
केडगाव : नगरमधील नाशिक विभाग शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांना विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या जून २०१८ मध्ये होणाऱ्या निवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे या निवडणुकीसाठी आता नगर जिल्ह्य तीन उमेदवार मैदानात उतरले आहेत.
येत्या जून महिन्यात नाशिक विभाग शिक्षक मतदासंघाची निवडणूक होत आहे. टिडीएफकडून प्रा.भाऊसाहेब कचरे व माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव आप्पासाहेब शिंदे याआधीच रिंगणात उतरले आहेत. टिडिएफकडुन जिल्ह्यात एकच उमेदवार असावा यासाठी जिल्ह्यातील ५ इच्छुकांनी एकीचा सूर आवळला. मात्र हा फक्त देखावा असल्याचे नंतर जाहीर झाले असल्याने इच्छुकांच्या एकीचे नाटक सर्व मतदारांसमोर उघडे पडले. जिल्ह्यात शिक्षकांमध्ये एकजूट नसल्याने व गटातटाचे राजकारण या एकजुटीत मोठी अडचण असल्याने शिक्षक आमदारकीची संधी नगरला मिळू शकली नाही. यामुळे जिल्ह्यात टिडीएफमध्ये मोठी ताटातूट झाल्याने एक गट कचरे यांच्या मागे, दुसरा गट शिंदे यांच्या मागे तर तिसरा टिडिएफचा गट धुळ्याचे संदीप बेडसे यांच्या मागे आहे.
टिडिएफमध्ये गट तट पडले. त्यात शिक्षक परिषदेने या गटातटाच्या राजकारणाचा फायदा घेण्यासाठी प्राचार्य सुनील पंडित यांना रिंगणात उतरवले आहे. पंडित यांना मागील वेळीही परिषेदेने उमेदवारी दिली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाल होता. यावेळी पुन्हा परिषदेची उमेदवारी पंडित यांनाच देण्यात आली. यामुळे जिल्ह्यात आता तीन उमेदवार रिंगणात आहेत.
पंडित उमेदवारीचे पत्र राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, आ. ना. गो.गणार, मा. आ. भगवानराव साळुंखे, संजीवनीताई रायकर, नरेंद्र वातकर, बाबासाहेब काळे, अनिल बोरनारे, किरण बावठांनकार, विठ्ठल ढगे, अनिल आचार्य यांच्या हस्ते देण्यात आले.