शिक्षिकेने टाकाऊ वस्तूंपासून बनविले कृत्रिम पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:26 AM2021-02-27T04:26:45+5:302021-02-27T04:26:45+5:30
बोधेगाव : उन्हाच्या दाहकतेने परिसरातील तहानलेल्या पशू-पक्ष्यांची पाण्याअभावी होरपळ होते. अशा तहानेने व्याकूळ झालेल्या पक्ष्यांसाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ...
बोधेगाव : उन्हाच्या दाहकतेने परिसरातील तहानलेल्या पशू-पक्ष्यांची पाण्याअभावी होरपळ होते. अशा तहानेने व्याकूळ झालेल्या पक्ष्यांसाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका शिक्षिकेने स्वतः हाती छन्नीहातोडी घेऊन टाकाऊ वस्तूंपासून कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. सध्या पक्षी वाचवा उपक्रमातून त्या पालकांना पाणवठे भेट म्हणून देत आहेत.
बोधेगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत अंजली तुकाराम चव्हाण या उपक्रमशील शिक्षिका उपाध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अंगणात येणाऱ्या पशू-पक्ष्यांची पाण्यावाचून होणारी तडफड पाहून त्यांच्यासाठी छोटेसे वाॅटर फिडर बनविण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी किराणा दुकानातून २० रिकामे तेलाचे डब्बे विकत आणले. डब्यांची स्वच्छता करून स्वतः पक्कड, छन्नीहातोडीच्या साहाय्याने सोशल मीडियावर आलेल्या एका वाॅटर फिडरचा फोटो पाहून त्याप्रमाणे डब्बे कट केले. लहान मुलांना हाताळणीसाठी सुलभ होईल अशा पद्धतीने डब्यांचे काठ, कोपरे पक्कडीने दाबून घेतले. पाण्यासोबतच पक्ष्यांना धान्यही ठेवता येईल, अशी त्या पत्र्याच्या डब्यांची रचना केली. टाकाऊ अशा वस्तूंपासून टिकाऊ व आकर्षक असे कृत्रिम पाणवठे तयार केले.
गृहभेटी दरम्यान अंजली चव्हाण या पाणवठ्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून घरोघरी जाऊन पालकांना कृत्रिम पाणवठे भेट देत आहेत. शाळेतही झाडांवर लटकविण्यासाठी काही पाणवठे त्यांनी तयार केले आहेत.
---
२६ बोधेगाव पाणवठे
बोधेगाव शाळेतील शिक्षिका अंजली चव्हाण यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेले कृत्रिम पाणवठे.