शिक्षकांची बदली आता तीन नव्हे पाच वर्षांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:43+5:302021-04-13T04:19:43+5:30
ग्रामविकास विभागाने ७ एप्रिलला शासन निर्णय जाहीर केला असून त्यामध्ये आंतरजिल्हा तसेच जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्याबाबत काही सुधारित धोरण ...
ग्रामविकास विभागाने ७ एप्रिलला शासन निर्णय जाहीर केला असून त्यामध्ये आंतरजिल्हा तसेच जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्याबाबत काही सुधारित धोरण जाहीर केले आहेत. या धोरणाबाबत शिक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महत्त्वाचा बदल म्हणजे यापूर्वी सर्वसाधारण क्षेत्रात एकाच शाळेवर तीन वर्षे सेवा केल्यानंतर बदली होत होती. आता संबंधित शिक्षकांना एकाच शाळेवर पाच वर्ष सेवा करावी लागणार आहे. त्यानंतर तो शिक्षक बदलीसाठी पात्र होईल. यासंदर्भात काही शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. कारण पाच वर्षे एका शाळेवर राहिले तर संबंधित शिक्षकाला आणि एकूणच शिक्षणाला स्थैर्य येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे जे शिक्षक बदलीसाठी इच्छुक आहेत ते आणखी दोन वर्षे अडकून पडणार आहेत.
दुसरी बाब म्हणजे आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना पूर्वी एकच जिल्ह्यात बदलीसाठी अर्ज करता येत होता. आता त्यासाठी त्यांना चार जिल्ह्यांचा पर्याय असेल. याशिवाय पाच वर्षानंतर संबंधित शिक्षक पुन्हा आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करू शकतात. पूर्वी ही तरतूद नव्हती. जिल्हांतर्गत बदलीमध्ये पूर्वी शिक्षकांना बदलीसाठी २० शाळा निवडता येत होत्या, आता ३० शाळा निवडता येणार आहेत. त्यामुळे शिक्षकांसमोर आणखी पर्याय खुले झाले आहेत.
-----------
त्या शिक्षकांना दरवर्षी
अर्ज करता येणार नाही
यापूर्वी संवर्ग १ मधील दिव्यांग किंवा व्याधिग्रस्त शिक्षकांना, तसेच संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत शिक्षकांना दरवर्षी बदलीसाठी अर्ज करता येत होता. या नवीन धोरणात मात्र आता त्यांना तीन वर्षांनी बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे या शिक्षकांची ही संधी काही प्रमाणात कमी करण्यात आली आहे.
---------
अवघड क्षेत्रातून मात्र
तीन वर्षात बदली
नवीन धोरणानुसार अवघड क्षेत्रात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा केलेले शिक्षक बदलीला पात्र ठरणार आहेत. तसेच सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा आणि एकाच शाळेवर पाच वर्षे सेवा केलेले शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत.
----------
जिल्हा परिषदेकडून माहितीचे संकलन सुरू
नवीन धोरणानुसार संवर्गनिहाय किती शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत त्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून घेण्याचे काम सुरू झाले आहे. संवर्गनिहाय ही माहिती आल्यानंतर ३१ मे पर्यंत शिक्षकांच्या बदल्या होऊ शकतात.
------------------
ज्या शिक्षकांनी पेसा क्षेत्रात तीन वर्षे पूर्ण केले आहेत, त्यांना त्यांच्या तालुक्यात बदली मिळायला हवी होती. परंतु नवीन धोरणानुसार शासन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष सेवा केल्यानंतर बदलीस पात्र ठरवत आहे. म्हणजे पेशातील शिक्षकांना त्यांच्या तालुक्यात जाण्यास अजून अवधी लागेल, ही त्यांची गैरसोय आहे.
- सुदाम भागवत, माजी संचालक, शिक्षक बँक
----------
आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांसाठी नवीन नियमावलीत चांगले बदल आहेत. आंतरजिल्हा बदली नंतर पुन्हा पाच वर्षांनी संबंधित शिक्षकाला बदली मागता येणार आहे. हा निर्णय समाधानकारक आहे. शिवाय तीन वर्षांनी होणारी बदली आता पाच वर्षांनी होते. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षणामध्ये स्थैर्य येईल.
- संदीप मोटे, जिल्हा सरचिटणीस, शिक्षक संघ